बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला (Beed corona virus) आहे. अशातच कुणीही घराबाहेर निघू नये असं वारंवार आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र काही हौशी मंडळी सरकारच्या सूचनेचं पालन करताना दिसून येत नाही. अशाच हौशी मंडळींना थारेवर आणण्यासाठी बीड जिल्ह्यातील एका गावात एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. जर कुणी व्यक्ती तीनपेक्षा अधिक वेळा घरातून बाहेर पडला तर पाचशे रुपये दंड आकरण्यात येणार (Beed corona virus) आहे.
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी गावात अनेक जण विनाकारण घराबाहेर टवाळक्या करताना दिसून येत आहेत. गावातील काही ग्रामस्थ कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याने, गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी मिळून जर कुणी व्यक्ती तीन पेक्षा अधिक वेळा घराबाहेर पडल्यास पाचशे रुपये दंड आकरण्यात येईल, असा ठराव घेतला. तसेच तो व्यक्ती चौथ्यांदा घराबाहेर दिसल्यास त्याची गाढवावरुन धिंड काढण्यात येईल.
गावामध्ये दवंडी देऊन हा ठराव ग्रामस्थांपर्यंत पोहचवण्यात येतोय. केवळ एवढ्यावरच सरपंचाने न थांबता पारावर गप्पा मानणाऱ्यांना देखील चाप बसवला. गावातील पाराला डांबराने रंगवून ठेवलं आहे. त्यामुळे गाढवावरची धिंड टाळायची असेल तर कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. असा सल्ला देखील सरपंचांनी दिला आहे. तर काही ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत देखील केले.
दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या 1300 च्या वर पोहोचली आहे. तर राज्यात 300 पेक्षा अधिकांना कोरोना झाला आहे.