सांगली : महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातलं. सांगलीत गेल्या आठवडाभरापासून महापुराने (Sangli Flood) स्थानिक नागरिकांची अक्षरशः दाणादाण उडवली आहे. यामुळे आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जनावरांनाही याचा फटका बसला आहे. दरम्यान गेल्या आठवडाभरापासून थैमान घातलेल्या पुराचे पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे. पण पाणी ओसरण्याचा वेग अत्यंत संथ आहे. त्यामुळे सांगलीत अद्याप पूरस्थिती कायम आहे.
गेल्या आठवडाभरापासून सांगली शहरातील 65 टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. अनेक भागात महापुराचं पाणी शिरुन मुख्य बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तसेच सांगलीवाडी भागातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी निघालेले अनेक जण आयर्विन पुलावर (Irwin Bridge) अडकून पडले आहेत. त्यात महिला आणि लहान मुलांचं प्रमाण अधिक असून पूरग्रस्तांचे अन्न-पाण्यावाचून हाल झालेत. त्यातच आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी 57 फुटांवर पोहचली आहे. पुलाच्या पूर्वेला असलेल्या टिळक चौक, तसंच पश्चिमेला असलेल्या सांगलीवाडी भागात अद्याप महापुराचं पाणी साचलं आहे.
सध्या सांगलीत आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 56 फूट 8 इंच इतकी आहे. दरम्यान सांगलीत पुराच्या पाणी पातळी ओसरण्याच सुरुवात झाली असली, तरी त्याची गती फार संथ आहे. त्यामुळे गेल्या 12 तासात कृष्णा नदीचे पाणी केवळ 1 फुटाने कमी झाले आहे. कृष्णा नदीची धोक्याची पातळी 45 फूट असून इशारा पातळी ही 40 फूट आहे. त्यामुळे अजून जवळपास 15 फूट पाणी पातळी कमी होणे गरजेचे आहे. सांगलीत पुराचे पाणी वाढताना जवळपास फुटाने वाढले होते. मात्र आता पाणी ओसरताना पाणी हे इंचाने कमी होत आहे. त्यामुळे सांगली शहर तसेच इतर गावातील घर आणि दुकाने अद्याप पाण्याखाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
बचावकार्य वेगाने
बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) ची तीन पथकं आणि राज्य आपत्ती निवारण (एसडीआरएफ) ची दोन पथकं पाचारण करण्यात आली आहेत. आतापर्यंत एक लाख 19 हजार 176 पूरग्रस्त आणि 25 हजार 260 जनावरांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे.