नागपूर : सोशल मिडीयावर कुठल्या चर्चेला उधान येईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर मित्र मंडळी 31 डिसेंबरच्या पार्टीचा बेत आखत आहेत. या प्लॅनिंगमध्ये अनेक चिकन खवय्यांची पहिली पसंती कडकनाथ कोंबडीला आहे. काळा रंग, काळ मांस, काहीसं काळंच रक्त आणि चवदार चिकन अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांची धनी असलेल्या कडकनाथ कोंबडीला चिकन खवय्यांची पहिली पसंती आहे.
सोशल मिडीयावर सध्या कडकनाथ कोंबडीची चर्चा जोरात आहे. त्यामुळेच मागणी वाढल्याने सध्या कडकनाथ कोंबडीची किंमत 1200 ते 1500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
काही महिन्यांपूर्वीच याच कडकनाथ कोंबडीमुळे दोन राज्यांमध्ये भांडण लागलं होतं. म्हणजे कडकनाथ या कोंबडीचं मुळ आमच्या राज्यातलं आहे, आसा दावा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशकडून करण्यात आला होता.
आता 31 डिसेंबरच्या निमित्ताने पुन्हा एकदा कडकनाथ या कोंबडीची चर्चा सुरु झाली. सोशल मिडीयावरील चर्चेमुळे अनेक चिकन खवय्यांनी 31 डिसेंबरला कडकनाथवर ताव मारण्याचा बेत आखला आणि आजपासूनच कडकनाथच्या खरेदीची तयारी सुरु झाली. 31 डिसेंबरच्या निमित्ताने मागणी वाढल्यामुळे कडकनाथ कोंबडीचे दर गगनाला भिडले आहेत. ऐरवी 600-700 रुपयाला विकल्या जाणाऱ्या या कोंबडीचे भाव आज 1200 ते 1500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. खवय्ये या कडकनाथ कोंबडीसाठी जास्तीचे पैसे मोजायलाही तयार आहेत.
दरवर्षी 31 डिसेंबरला नागपूरात 50 हजारपेक्षा जास्त कोंबड्यांचं चिकन आणि हजारो बोकडांच्या मटनाची विक्री केली जाते. यंदाही अशाच प्रकारे पार्ट्यांचा बेत आखला जात आहे. पण यंदाच्या पार्ट्यांमध्ये कडकनाथ कोंबडीला खवय्यांची पहिली पसंती आहे. त्यामुळेच कडकनाथ कोंबडीचे दर जवळपास दुप्पटीने वाढले आहेत.