नवी दिल्ली : भारतीय सैन्याविरोधात खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) ची विद्यार्थी आणि कार्यकर्ता शेहला रशीदवर (Shehla Rashid) देशद्रोहाचा गुन्हा (Sedition case) दाखल करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टाचे वकील आलोक श्रीवास्तव यांनी तक्रार दिल्यानंतर 3 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिली. आलोक श्रीवास्तव यांच्याकडून शेहला रशीदच्या (Shehla Rashid) अटकेचीही मागणी करण्यात आली आहे.
शेहला रशीद जेएनयूमध्ये पीएचडी करत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “शेहला रशीदविरोधात काश्मीर घाटीत सैन्याच्या कारवाईबाबत चुकीचं ट्वीट केल्याचा आरोप आहे. त्यामुळे भा. दं. वि. कलम 124A (देशद्रोह), कलम 153A (शत्रूत्वाला बळ देणं), 504 (जाणिवपूर्वक शांतात बिघडवण्याच्या दृष्टीने अपमान करणे) आणि 505 (कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारं वक्तव्य करणं) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाचे वकील आलोक श्रीवास्तव यांच्याविरोधात यांनी तक्रार केली होती.”
शेहला रशीदने यापूर्वी अनेक ट्वीट केले होते. भारतीय सैन्य काश्मीर घाटीत लोकांना अंदाधुंद पद्धतीने उचलून नेत आहे, घरात छापेमारी केली जात असून लोकांचा छळ केला जातोय, असं ट्वीट तिने केलं होतं. सत्ताधारी भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी मानवाधिकारांचं उल्लंघन केलं जातंय, असाही आरोप शेहला रशीदने केला होता.
भारतीय सैन्याविरोधात आरोप केल्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण भारतीय सैन्याने चौकशी लावली तर आपण पुरावे द्यायला तयार असल्याचंही शेहला रशीदने म्हटलं होतं. भारतीय सैन्यानेही हे आरोप अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
दरम्यान, देशद्रोहाचा गुन्हा हा राजकीय द्वेशातून दाखल करण्यात आल्याचा आरोप शेहला रशीदने केलाय. सुप्रीम कोर्टात कलम 370 विरोधात मी याचिका दाखल केली असून माझी बाजू अत्यंत मजबूत आहे. पण मला शांत करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांनी काश्मीरच्या जनतेच्या मागे उभं रहावं, असं आवाहन शेहला रशीदने केलंय.