श्रीनगर: भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भारतात पोहोचण्यापूर्वीच पाकिस्तानने पुन्हा नंगानाच सुरुच ठेवला आहे. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, मेंढर, हंदवाड्यात दहशतवाद्यांसोबत भारतीय जवानांची चकमक सुरु आहे.या चकमकीत भारताचे 4 जवान शहीद झाले आहेत, तर 8 जवान जखमी आहेत. तर भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं सांगण्यात येत आहे.
एकीकडे एक जवान जिवंत सोपवला जात असताना, दुसरीकडे पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याने, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, याचीच प्रचिती येत आहे.
एकीकडे पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दुसरीकडे दहशतवाद्यांसोबत चकमक, असं दुहेरी तोंड भारतीय जवान देत आहेत.
पुलवामा इथं 14 फेब्रुवारीला भीषण दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये टोकाचा तणाव आहे. भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरसह बालाकोट इथं दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्ताननेही F16 या अमेरिकन बनावटीच्या विमानांसह 27 फेब्रुवारीला भारतीय हवाई सीमेत घुसखोरी करुन भारतीय तळांवर बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पाकिस्तानी विमानांना हुसकावून लावताना, भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं विमान पाडलं. त्याचवेळी विंग कमांडर अभिनंदन यांच्या विमानालाही अपघात झाला आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी आर्मीच्या ताब्यात सापडले. तेव्हापासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांची आज सुटका झाली आहे.