भुवनेश्वर : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावर देशभरातून विरोध होऊ लागला आहे, तसेच सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणीदेखील होऊ लागली आहे. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. (Free corona vaccine to all Indians; Announcement of Union Minister Pratap Chandra Sarangi)
देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी (Pratap Sarangi) यांनी दिली आहे. ओदिशाचे अन्न पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री आर. पी. स्वॅन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय पशुपालन, डेअरी, मत्स्य, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री सारंगी यांनी सांगितले की, सर्व भारतीयांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे.
स्वॅन यांनी फ्री वॅक्सिनची मागणी केली होती. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सारंगी यांच्याकडे उत्तर मागितलं होतं. हे दोन्ही केंद्रीय मंत्री सध्या ओदिशामध्ये आहेत. बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने घोषणा केली होती की, बिहारमध्ये मोफत कोरोनाची लस दिली जाणार आहे. यावरुन स्वॅन यांनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना घेरले. त्यानंतर सारंगी यांच्याकडून सारवासारव करण्यात आली.
स्वॅन यांनी ट्विट केले होते की, “मी ओदिशाच्या दोन केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारु इच्छितो. या दोघांनी सांगावं की आपल्या राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत का मिळू नये? कोरोनावरील लसीकरणाविषयीच्या भाजपच्या भूमिकेबाबत दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावं”.
बिहारमध्ये मोफत लस, मग उर्वरित भारत काय बांगलादेशात आहे का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल
रविवारी ऑनलाईन दसरा मेळाव्यातून जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोला केला. बिहारमध्ये सरकार आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. यावर बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांगलादेशात आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसेच इतर राज्यांमध्ये लस विकत देणार का? असा सवालही त्यांनी केला.
मोदी सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीदेखील या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देशातील लोकांना राज्यातील निवडणुकांच्या तारखा पाहून त्यांना करोनाची लस कधी मिळेल हे समजणार आहे, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारला लगावला आहे.
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘भारत सरकारने कोव्हिड लशीची घोषणा केली आहे. लस आणि खोट्या वचनांची पूर्ती कधी होणार, हे पाहण्यासाठी कृपया तुमच्या राज्यातील निवडणुकीची तारीख पाहा.’ जेथे निवडणुका असतील तेथेच फक्त लोकांना करोनाची मोफत लस मिळणार आहे.
भारत सरकार ने कोविड वैक्सीन वितरण की घोषणा कर दी है।
ये जानने के लिए कि वैक्सीन और झूठे वादे आपको कब मिलेंगे, कृपया अपने राज्य के चुनाव की तारीख़ देखें।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 22, 2020
लस सर्वांनाच मोफत द्या : अरविंद केजरीवाल
संपूर्ण देशातील जनता करोना संसर्गाला तोंड देत असल्याने सगळ्यांनाच ही लस मोफत उपलब्ध व्हावी, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.
संबंधित बातम्या
मोठी बातमी…भारतात कोरोनामुक्त होण्याचा दर 90 टक्क्यांवर, आरोग्य मंत्रालयाची माहिती
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण
देशातील नागरिक कोरोनानं त्रस्त, प्रत्येकाला मोफत लस मिळावी: अरविंद केजरीवाल
Coronavirus Vaccine: पुढच्या वर्षी जूनपर्यंत येणार कोरोनाची देशी लस, भारत बायोटेकचा दावा
(Free corona vaccine to all Indians; Announcement of Union Minister Pratap Chandra Sarangi)