मुंबई : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन वीरपुत्रांवर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान संजय राजपूत आणि नितीन राठोड यांना गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव आज मूळगावी आणण्यात आलं. त्याआधी औरंगाबाद विमानतळावर या वीरांच्या पार्थिवाला वंदन केलं. या वीरांना अखेरचा सलाम करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. संजय राजपूत यांच्यावर मलकापूरमध्ये तर नितीन राठोड यांच्यावर लोणार तालुक्यातील चोरपांग्रा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात बुलडाण्यातील मलकापूर येथील 49 वर्षीय संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील नितीन राठोड या दोन जवानांना वीरमरण आलं. संजय राजपूत 10 दिवसापूर्वी सुट्टी संपवून काश्मीरला गेले होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह मित्रांनाही मोठा हादरा बसला आहे.
कोण होते संजय राजपूत?
संजय राजपूत हे 115 बटालियनचे होते. त्यांना 3 भाऊ आणि 1 बहीण आहे. यातील एका भावाचा अपघातात मृत्यू झाला होता. सध्या दोघे भाऊ आहेत. संजय यांना 12 वर्षीय जय आणि 11 वर्षांचा शुभम अशी 2 मुले आहेत. 8 मे 1973 रोजी जन्मलेले संजय राजपूत हे वयाच्या 23 व्या वर्षी भरती झाले होते. त्यांची सीआरपीएफमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली होती. मात्र त्यांनी पाच वर्षे वाढवून घेतली होती.
वाचा: पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे
अतिशय गरीब परिस्थितीत 8 मे 1973 रोजी संजय राजपूत यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण मलकापूरच्या नूतन विद्यालयात झालं. तर माध्यमिक शिक्षण हे जनता कला महाविद्यालयात झालं. शाळेच्या दिवसातच संजय यांना देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, म्हणून त्यांनी एनसीसी जॉईन केली. त्यानंतरच बारावीनंतर ते सीआरपीएफमध्ये भरती झाले होते.
1996 मध्ये ते नागपूरमध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले. त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरामध्ये झाली होती. संजय यांनी देशासाठी 23 वर्ष सेवा केली..त्यात त्यांनी 5 वर्ष वाढवून घेतली होती.
वाचा: पुलवामा हल्ला : कुणी सुट्टी संपवून परतलं होतं, तर कुणाचं लग्न ठरलं होतं
संजय यांनी देशासाठी प्राणांची बाजी लावली. याचा त्यांच्या कुटुंबाला सार्थ अभिमान आहे. मात्र शत्रूशी दोन हात करताना नाही तर पाकिस्तानच्या भेकड हल्ल्यात त्यांना जीव गमवावा लागल्याचं दुःखही आहे.
संजय राजपूत यांच्या निधनानं अवघ्या राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतिक म्हणून येत्या काळात मलकापूरमध्ये त्यांचं स्मारक बांधण्यात येणार आहे.
कोण होते नितीन राठोड?
काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातीचे सुपुत्र शहीद झालेत. नितीन राठोड यांना पुलवामात वीरमरण आलं. नितीन राठोर हे बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याल्या चोरपांग्री गावाचे रहिवाशी होते. नितीन राठोड यांना विरमरण आल्याची बातमी समजातच त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. पत्नी आणि आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाही. गावातही शोककळा पसरली आहे. नितीन राठोड यांना विरमरण आल्याची बातमी समजातच गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या घरी धाव घेतली. संपूर्ण गावात शोककळा पसरली. त्यामुळं दहशतवादी हल्ला करणाऱ्या लोकांना भारत सरकारनं चांगलाच धडा शिकवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पाकिस्तानला चांगला धडा शिकवल्याशिवाय हल्ले थांबणार नाहीत. त्यामुळं पाकिस्तानला त्यांच्या घरात जावून मारा अशा तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केल्यात.
पुलवामा हल्ला
जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले आहेत, तर 38 जवान जखमी आहेत. जखमी जवानांवर जम्मूतील बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान 92, 17, 54, 82, 61, 21, 98, 118, 76, 45, 3 आणि 176 या बटालीयनचे होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने (Jaish E Mohammed) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar) नावाच्या दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. आदिल हा पुलावामातील काकापोरा भागात राहात होता.
व्हिडीओ पाहा :