नाशिक : राज्यात गणरायाचे जल्लोषात स्वागत होत असतानाच मनमाडच्या सर्वधर्मीय चाकरमान्यांनी थेट रेल्वे गाडीतच गणरायाची स्थापना केली आहे. दररोज मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या चाकरमन्यांनी मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya tilak Terminals) या गोदावरी एक्स्प्रेसमध्ये (Godavari Express) गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. यावर्षीही गणरायाची वाजत-गाजत उत्साहात स्थापना करत दररोजचा प्रवास सुखाचा होण्याची कामना केली.
मनमाड शहरातून मोठ्या संख्येने नागरिक नाशिक-मुंबई कामासाठी अप-डाऊन करतात. त्यातही गोदावरी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव काळात सर्व चाकरमानी घराबाहेर असतात त्यांनाही गणेशोत्सवाचा आनंद करता यावा, या उद्देशाने मनमाड-नाशिक प्रवास करणाऱ्या वर्गाने गोदावरी एक्स्प्रेसच्या पासधारक बोगीत विधिवत पूजा करुन गणरायाची प्रतिष्ठापना केली.
या बोगीत आकर्षक सजावट करण्यात आल्याने इतर प्रवाशांचे या बोगीकडे लक्ष वेधले जाते. गणेशोत्सवाचे दहा दिवस गोदावरी एक्स्प्रेसमध्ये सकाळी मनमाडला आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासात नाशिक येथे आरती केली जाते. गणेशोत्सव काळात प्रवास करणारे प्रवाशीही आवर्जून गणरायाचे दर्शन घेताना प्रवास सुखाचा होण्याची कामना करतात. विशेष म्हणजे गोदावरी एक्स्प्रेसमध्ये केवळ गणेशोत्सव साजरा केला जात नाही, तर या काळात सामाज प्रबोधनाचा संदेशही दिला जातो. या वर्षी स्वच्छता अभियानावर भर देत स्वच्छतेवर जनजागृती करणारे पोस्टर गाडीत लावण्यात आले आहेत.
मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसमध्ये साजरा होणाऱ्या आगळ्या-वेगळ्या गणेशोत्सवाची मनमाड-मुंबई दरम्यानच्या रेल्वे स्थानकाबरोबरच राज्यभर ख्याती आहे. दररोज 500 किलो मीटर अंतराचा प्रवास करणारे प्रवाशी एरव्ही आपापल्या कामात व्यस्त असतात. मात्र गणेशोत्सवाचे हे दहा दिवस सर्वधर्मीय नोकरदार, प्रवाशी एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करुन राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन घडवीत असतात.