गाझियाबाद: काळा पैसा आणि बेहिशेबी मालमत्ता लपवण्यासाठी अनेक जण विविध शक्कल लढवत असतात. मात्र आयकर विभाग (इनकम टॅक्स) कर बुडवणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी आता सॅटेलाईट इमेज ही नवी यंत्रणा कार्यरत केली आहे. नुकतेच या यंत्रणेद्वारे उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील एका व्यक्तीची 15 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड करण्यात आयकर विभागाला यश आलं आहे. याप्रकरणी गाझियाबाद आयकर विभागाने त्याच्यावर कारवाई सुरु केली आहे.
अशी उघड झाली चोरी!
गाझियाबाद येथील मोदी नगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने 3 वर्षांपूर्वी काही एकर जमीन विकत घेतली. या जमिनीवर त्याने एक कर्मशिअल कॉम्प्लेक्स उभारले. पण आयकर विभागाकडे याबाबत नोंद करताना त्याने ही जमीन शेत जमीन असल्याचे दाखवले. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून त्याला या जमिनीसाठी कोणताही कर द्यावा लागत नव्हता.
मात्र काही दिवसांपूर्वी आयकर विभागातील कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे गाझियाबादमधील आयकर विभागाने हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीची मदत घेण्याचे ठरवले. त्यानुसार आयकर विभागाने या एजन्सीला तीन वर्षापूर्वीचे आणि आताचे काही फोटो काढण्यास सांगितले.
त्या एजन्सीने काढलेल्या फोटोमध्ये आणि 3 वर्षाच्या फोटोमध्ये फार फरक जाणवला. त्यानंतर आयकर विभागाने त्या ठिकाणी जाऊन सर्व चौकशी केली. चौकशीदरम्यान आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, साधारण 3 वर्षापूर्वी 30 लाख रुपयाला या जमिनीची विक्री करण्यात आली होती. त्यानंतर या जमिनीची नोंद करतेवेळी ही आयकर विभागाला ही शेतजमिन असल्याचे भासवण्यात आले. तसंच यासोबत एक फोटोही आयकर विभागाला नोंदणीद्वारे देण्यात आला. पण आयकर विभागाला गेल्यावर्षी जून महिन्यात याबाबत संशय आला. त्यानंतर त्यांनी तपास सुरु केला. हा तपास करण्यासाठी आयकर विभागाने हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीची मदत घेत आताचे काही फोटो सॅटेलाईटद्वारे मागवून घेतले आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
दरम्यान अशाप्रकारे सॅटेलाईटचा वापर करत पकडण्यात आलेली ही देशातील पहिलीच चोरी आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीकडून नोटीस पाठवली आहे. तसेच त्याच्याकडून 15 कोटी रुपयांचा टॅक्स वसूल येणार आहे.
पाहा व्हिडीओ: