औरंगाबाद : कधी अवकाळीचा फटका तर कधी बाजारपेठेतील दर कारण कोणतेही असो नुकसान मात्र, शेतकऱ्यांचे होत आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीपासून पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामधूनही ज्या पिकांची जोपासना झाली आहे त्यांना दरात फटका बसलेला आहे. पपई, अद्रक याचे मोठे उत्पादन झाले आहे. पण कवडीमोल दरामुळे नुकसानीप्रमाणेच या पिकांचीही अवस्था झाली आहे. खरेदीअभावी अद्रकचे ढीग तर वावरातच पडले असल्याचे चित्र मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे. अद्रकचे बेणं 4 हजार रुपये क्विंटल अन् आता बाजारपेठेत अद्रकाला दर आहे तो 700 रुपये क्विंटलचा. त्यामुळे नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांची सुटका झाली तरी पुढे शेतीमालाची विक्री होईपर्यंत अनेक अडथळ्यांचा शर्यत शेतकऱ्यांना पार पाडावी लागत आहे.
अद्रकाला दरवर्षी मागणी असते. यंदा मात्र, मागणीच नसल्याने दरामध्ये मोठी घट झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील भराडी, धानोरा, वांजोळा, मांडगाव, दीडगाव या भगात नव्यानेच शेतकरी हे अद्रकाचे उत्पादन घेऊ लागले आहेत. मात्र, घटलेल्या दरामुळे बेणं आणि लागवडीवर झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी 4 हजार क्विंटल रुपयांनी अद्रकाचं बेणं विकत घेतले. याशिवाय वर्षभर जोपासण्याचा खर्च हा वेगळाच. असे असताना केवळ 700 रुपये क्विंटलने अद्रकाची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे या गावच्या शिवारात अद्रक विक्रीसाठी ढिगारे लावण्यात आले आहेत. मात्र, व्यापारीच फिरकत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील भडारी, धानोरा या भागातील शेतकरी हे खरिपातील मुख्य पिकाबरोबर अद्रकाचीही लागवड करीत आहेत. उत्पादन वाढीच्या अनुशंगाने त्यांनी हा प्रयोग सुरु केला आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अद्रक पिक जोमात होते. त्यामुळे उत्पादनात वाढ तर झाली आहे पण आता दरात मोठी घसरण झाली आहे. ही तर काढणीची सुरवात असून पुन्हा आवक वाढल्यावर तर दर काय होतील याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. अद्याप केवळ 10 टक्केच अद्रक काढणी झाली असल्याचे या धोनोरा येथी शेतकऱ्याने सांगितले आहे.
उत्पादन वाढीच्या अनुशंगाने मराठवाड्यातील शेतकरीही पिक पध्दतीमध्ये बदल करीत आहे. अद्रकाची लागवड करण्यापूर्वीच ठिबक सिंचनाची सोय करावी लागते. त्याशिवाय महागडे बेणे खरेदी करुन त्याची वाहतूक करावी लागते. लागवड, शेणखत, रासायनिक खत, औषध फवारणी आणि काढणी असा एकरी लाखाहून अधिक खर्च होत आहे. परंतु, आज बाजारात 700 रुपये क्विंटलचा दर आहे. शिवाय इतर फळबागातूनही शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. म्हणून पीक पध्दतीमध्ये बदल करावा का नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे.