नवी दिल्ली: दिल्ली महिला आयोगाने (DCW) गुरुवारी (8 ऑगस्ट) दिल्लीतील जीबी रोडवरील (GB Road) वेश्यालयातून 27 वर्षीय एका सुशिक्षित तरुणीला मुक्त केले आहे. विशेष म्हणजे पीडित मुलीचा भाऊ जेव्हा या वेश्यालयात गेला तेव्हा समोर बहिणीला पाहून त्याला धक्काच बसला. त्याची बहिण काही दिवसांपूर्वी दिल्लीला चांगली नोकरी करण्यासाठी आली होती. मात्र, त्यानंतर तिचा कोणताही संपर्क झाला नाही आणि ती थेट वेश्यालयातच दिसली.
पीडित तरुणी कोलकात्याची असून ती याआधी कोलकात्यातील एका मोठ्या कंपनीत काम करत होती. काही दिवसांपूर्वी 8 जूनला एक व्यक्ती तिला दिल्लीत अधिक चांगली नोकरी देतो असे सांगून दिल्लीला घेऊन आला. मात्र, दिल्लीला पोहचल्यावर तिच्याकडून घरी कुणालाही फोन आला नाही. कुटुंबीयांनी फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा संपर्क होऊ शकला नाही. घरच्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिची काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी कोलकाता पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
‘बंगाली ग्राहकाची मदत केली’
बहिण सापडण्याची आशा मावळली असतानाच पीडित मुलीच्या भावाला एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. त्याने त्याची बहिण दिल्लीतील जीबी रोड येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर भाऊ तात्काळ दिल्लीला आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीला भेटला. तो व्यक्ती ग्राहक म्हणून जीबी रोड येथे गेला होता. त्यावेळी तो बंगाली बोलत असल्याचे पाहून पीडित मुलीने त्याला मदत करण्याची विनंती केली आणि भावाचा मोबाईल नंबर देऊन त्याला सांगण्यास सांगितले होते.
बहिणीची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरुणीच्या भावाने त्या व्यक्तीच्या मदतीने स्वतः ग्राहक बनत थेट जीबी रोडवरील वेश्यालय गाठले. तेथे त्याला जबरदस्तीने आणि फसवून वेश्या व्यवसायात अडकवलेली आपली बहिण भेटली. त्यानंतर पीडित तरुणीने आपल्यावर ओढावलेली सर्व आपबिती भावाला सांगितली. भावाने तात्काळ दिल्ली महिला आयोगाची मदत घेतली. दिल्ली आयोगाच्या सदस्या किरण नेगी यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पीडित तरुणीच्या भावासोबत पाठवले. दिल्ली आयोगाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने पीडित तरुणीला तेथून बाहेर काढले. तसेच तिचा जबाब घेऊन दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित तरुणीचा ‘आपबिती’
पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले, “मी कोलकाता येथे एका मोठ्या खासगी कंपनीत काम करत होते. तेथे माझी भेट ज्योत्सना नावाच्या एका महिलेशी झाली. त्यानंतर तिच्याशी मैत्री झाली. तिने 2 महिन्यांपूर्वी रमजान नावाच्या व्यक्तीची भेट घालून दिली. तो मला दिल्लीत अधिक चांगली नोकरी देतो म्हणून दिल्लीला घेऊन आला. दिल्लीला आल्यानंतर या व्यक्तीने मला जीबी रोड येथील वेश्यालयात विकले. येथे मला जबरदस्तीने देहव्यापार करायला लावण्यात आला. दररोज जवळपास 15-20 लोक माझ्यावर बलात्कार करत होते. एक दिवस एक बंगाली बोलणारा ग्राहक आला आणि मग त्याला माझी आपबिती सांगितल्यानंतर त्याने मदत केली.”
‘दिल्लीत जीबी रोडवरील वेश्यालयाच्या स्वरुपात एक टाईम बॉम्ब’
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर कमला मार्केट पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 370/376/109/34 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणी वेश्यालयाचा व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले, “दिल्लीत जीबी रोड येथे वेश्यालयाच्या स्वरुपात एक टाईम बॉम्ब ठेवण्यात आला आहे. त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही, असं लोकांना वाटत असेल, तर तो लोकांचा गैरसमज आहे. जीबी रोडवर विकली गेलेली तरुणी पदवीधर आहे. ती एका खासगी कंपनीत काम करत होती. तिचं दुःख भयावह आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोषींना अटक करायला हवी. तसेच इतर संस्थाशी समन्वय करत जीबी रोडवरील वेश्यालये बंद करायला हवीत. तेथील महिल देहव्यापाराच्या शिकार असून त्यांचं पुनर्वसन करणे देखील गरजेचं आहे.”
वेश्यालयात अडकलेल्या इतर महिलांना न्याय कधी मिळणार?
दिल्लीतील जीबी रोड (GB Road) परिसर वेश्यालयासाठी ओळखला जातो. या भागात देशभरातील अनेक तरुणींना फसवून, नोकरीचे आमिष दाखवून दिल्लीत आणले जाते आणि या कामात ढकलले जाते. पोलीस प्रशासनाला याची कल्पना असूनही हा गोरखधंदा राजरोजपणे सुरु असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करतात, मात्र प्रशासन यावर ढिम्म असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे यावर कारवाई कधी होणार आणि यात अडकलेल्या महिलांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आज तरी अनुत्तरीतच आहे.