जळगाव : लग्नसराईचे मुहूर्त संपल्यानंतरही सोने दर खाली येण्याचं नाव घेत नाही. सोने दराने गेल्या सहा वर्षातील उच्चांक गाठला आहे. जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 34 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे. इराण आणि अमेरिकेत निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे सोन्याचा भाव वाढल्याचे म्हटलं जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून जागतिक आणि भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढत आहेत.
राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून तो 34,470 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. इकडे मुंबईतही ट्रेडिंग बंद होईपर्यंत सोने दराने 34,588 रुपयांपर्यंत मजल मारली.
सोने दरवाढीची कारणे
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने दराने उच्चांक गाठला आहेच, शिवाय देशांतर्गत कारणेही दरवाढीला कारणीभूत आहेत.
रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीचं धोरण स्वीकारल्याने गुंतवणूकदार बँकेऐवजी सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला.
अमेरिका, चीन, इंग्लंड आणि भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशात व्याजदरात कपात होत आहे. त्यामुळे या सर्व देशांतील गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.