नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात काही असामाजिक घटक, डावे आणि माओवादी घुसल्याचा आरोप केंद्र सरकारकडून होत आहे. याला आता शेतकऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आंदोलनादरम्यान अनागोंदी माजवणाऱ्या असामाजिक घटकांना, गोंधळ निर्माण करणाऱ्या लोकांना थेट तुरुंगात टाका, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला केले आहे. असामाजिक घटक, डावे आणि माओवाद्यांनी शेतकरी आंदोलन हायजॅक केले असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. (Government puts anti-social elements behind bars farmers leaders reply to Center)
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या आंदोलनात कोणी असामाजिक घटक घुसल्याची कोणतीही कल्पना नाही. सरकार म्हणतंय त्याप्रमाणे जर कोणत्याही असामाजिक घटकांनी आमच्या आंदोलनात घुसखोरी केली असेल तर केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांना पकडायला हवं. जर कोणत्याही प्रतिबंधित संघटनेचे लोक शेतकरी आंदोलनात घुसले असतील, ते आमच्यात वावरत असतील, तर त्यांना तुरुंगात डांबायला हवं. जर आम्हाला असे लोक या आंदोलनात कुठे दिसले तर आम्ही स्वतःच त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊ”.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करत रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले होते की, “हे आंदोलन आता डाव्यांच्या आणि माओवाद्यांच्या हाती गेलं आहे. हे आंदोलन खरोखरच शेतकरी संघटनांनी केले असते तर आतापर्यंतच्या आश्वासनांनंतर ते मागे घेतले गेले असते. परंतु अनेक चर्चांनंतरही अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यांना अनेकदा आश्वासनं देण्यात आली, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयतन केला गेला. परंतु वारंवार आश्वासने देऊनही, त्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊनही, दुर्दैवाने हे आंदोलन अधिक तीव्र होत चाललंय. मुळात आता हा प्रकार वाढवण्यात काहीही अर्थ नाही.” (Infiltration of Leftist and Maoists in Delhi Farmers Protest; Piyush Goyal claims)
गोयल म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रस्ताव ठेवले आहेत. कृषी कायद्यांमध्ये संशोधन आणि सुधारणा करुन राज्य सरकारे खासगी बाजारांमध्ये रजिस्ट्रेशनची व्यवस्था लागू करु शकतील, याबाबतचाही प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे अधिकार हिरावत नाहीत. उलट शेतकऱ्यांना त्यांचे पिक कोणत्याही ठिकाणी विकण्याची परवानगी दिली जात आहे. असे असतानाही हे आंदोलन अजूनही का सुरु आहे? या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट काय असेल? याचा केवळ एकच अर्थ आहे की, शेतकरी आंदोलन आता डाव्यांच्या ताब्यात आहे. डाव्यांनी आणि माओवाद्यांनी हे आंदोलन हायजॅक केलं आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांची नाही, तर देशविरोधी शक्ती आणि देशविरोधी लोकांची मागणी आहे की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत”.
गोयल यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, “त्यांनी चर्चेसाठी पुढे यावं, तसेच डावे आणि माओवादी शक्तींपासून दूर राहावं. अनेक माध्यमांनी अशी माहिती दिली आहे की, दिल्लीत सुरु असलेलं शेतकरी आंदोलन डाव्यांनी आणि माओवाद्यांनी हायजॅक केलं आहे. डाव्यांनी, माओवाद्यांनी या आंदोलनात घुसखोरी केली आहे. काही मीडिया रिपोर्ट्स असं सांगतात की, या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये असे काही नेते आहेत, जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. गुन्हेगारी इतिहास असलेले काही नेते या आंदोलनाद्वारे देशात अराजकता पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत”.
संबंधित बातम्या
Kisan Andolan : कृषी कायद्याविरोधात आंदोलन आणखी पेटणार, 1500 ट्रकसह 30,000 शेतकरी दिल्लीत धडकणार
कृषी कायद्यावरुन भाजप Vs पवार, पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत फडणवीसांकडून घेरण्याचा प्रयत्न
(Government puts anti-social elements behind bars farmers leaders reply to Center)