नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील टीका-टिपण्णीची मालिका कायम असल्याचं चित्र आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा आहे. खरा लीडर किंवा खऱ्या नेतृत्वाचं कौशल्य हे आपत्कालीन परिस्थितीत समोर येतं असं कोश्यारी म्हणाले. (Governor Bhagat Singh Koshyaris indirect taunt on CM Uddhav Thackeray)
नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन इमारत आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल कोश्यारींनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाची सुरुवात अमित देशमुख यांच्या भाषणाने झाली. अमित देशमुख म्हणाले, “विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक परीक्षार्थीला कोव्हिड कवच देण्याचा निर्णय घेतला. राज्यपालांच्या सूचनांची पूर्ण अंमलबजावणी केली. त्याचा फायदा झाला”
हाच धागा पकडून राज्यपाल कोश्यारींनी अमित देशमुखांचं कौतुक केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “खरा लीडर हा आपत्कालीन परिस्थितीत लक्षात येतो. मंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ दिलीप म्हैसेकर यांनी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर घेतलेली ठाम, आग्रही भूमिका कौतुकास्पद आहे”.
कोरोना संकटात परीक्षा घेण्यावरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. परीक्षा घेण्यासाठी सरकार तयार नव्हतं तर राज्यपाल परीक्षा घेण्यासाठी आग्रही होते. राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संघर्षाचं हे काही एकमेव कारण नाही. मंदिरं उघडण्यावरुन मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं असो की धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्वावरुन झालेलं घमासान असो, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद जगजाहीर आहे.
त्यामुळेच राज्यपालांनी आज अमित देशमुखांच्या लीडरशीपवर केलेलं भाष्य म्हणजे मुख्यमंत्र्यांना टोमणा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
(Governor Bhagat Singh Koshyaris indirect taunt on CM Uddhav Thackeray)
संबंधित बातम्या