परभणीः राज्यात भाजप, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेस असा सत्ता संघर्ष सुरु असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना विरोधात एकनाथ शिंदेंचा संघर्ष पहायला मिळतोय. महाविकास आघाडीनेदेखील (Mahavikas Aghadi) अनेक ठिकाणी आपली गावं ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तर परभणीत काही वेगळंच चित्र दिसतंय. सेलू तालुक्यातल्या राजेवाडी गावात चक्क भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (BJP- NCP) समर्थकांनी युती केली. भाजप आमदार मेघना बोर्डीकर आणि त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या समर्थकांनी एकत्र येत राजेवाडीत पॅनल उभे केले. या पॅनलने एकहाती विजय मिळवल्याचे चित्र सध्याच्या मतमोजणीनंतर दिसत आहे. त्यामुळे एकिकडे शिवसेनेतील उभ्या फुटीचा फटका कुठे कुठे बसतोय, याकडे सर्वांचं लक्ष आहे तर दुसरीकडे परभणीतल्या भाजप-राष्ट्रवादीच्या युतीचीही जिल्हाभरात चर्चा होतेय.
सेलू तालुक्यातल्या राजेवाडी या ग्रामपंचायतीत चक्क भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी विजय देखील मिळवला आहे. राजेवाडी येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्राम विकास पॅनल स्थापन करण्यात आला. भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि त्यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या समर्थकांनी या निवडणुकीत युती करत एक हाती विजय मिळवला. दरम्यान, या युतीची तालुक्यासह जिल्ह्यात सध्या चर्चा रंगत आहे.
ब्राह्मण गाव-डुघरा येथेदेखील ग्रामविकास पॅनलचा विजय होताना दिसतोय. ग्रामपंचायतीत 4 सदस्य यापूर्वी बिनविरोध आले होते. (त्यात भाजप 2, राष्ट्रवादी -02). आज झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे 3 सदस्य निवडून आलेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे -2 आणि भाजप-1 एक उमेदवार विजयी झाला आहे.