वर्धा : पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराजवळील दहा ग्रामपंचायती परिसरात बांधकामाला बंदी घालण्यात आली आहे. दारुगोळा भांडारला लागून असलेल्या क्षेत्रात 2 किलोमीटर (2000यार्ड) क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. केंद्रीय दारुगोळा भांडर जवळील दहा ग्रामपंचायतींना हे आदेश देण्यात आले आहेत. नाचणगाव, गुंजखेडा, लक्ष्मीनारायणपूर, आगरंगाव, सोनेगाव(बाई), मुरदगाव(बे), मलकापूर, कवठा(रे), कवठा(झो), नागझरी, येसगाव या गावांचा यात समावेश आहे.
देशातील सर्वात मोठं शस्त्र भांडार हे वर्ध्याच्या पुलगाव येथे आहे. हे ठिकाण संवेदनशील घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच या परिसरातील शेतकऱ्यांवर दारुगोळा भंडार प्रशासनाने अनेक निर्बंध लादले आहेत. त्यासोबतच आता बांधकामाचे संकट या परिसरातील नागरीकांवर आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव आहे मात्र हा प्रस्ताव अद्यापही धूळखात दिसतोय.
महिन्याभरापूर्वी 20 नोव्हेंबरला येथील लष्करी तळावर बॉम्ब निकामी करताना भीषण स्फोट झाला होता. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते.
पुलगाव शस्त्रभांडार नेमकं काय आहे?
– वर्ध्यातील पुलगाव हे देशातील सर्वात मोठं तर आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्र भांडार आहे
– पुलगावात दारुगोळा बनवला जातोच, शिवाय मोठा शस्त्रसाठाही ठेवला जातो.
-बॉम्ब, दारुगोळा अशी मोठी युद्ध सामुग्री इथं साठवली जाते
-देशाच्या विविध ठिकाणी तयार झालेली स्फोटकं पुलगाव लष्करी तळावर साठवली जातात
– पुलगावात जवळपास 200 अधिकारी आणि सुमारे 5 हजार स्थानिक कामगार काम करतात
-दोन वर्षापूर्वी मे 2016 मध्येही इथे स्फोट होऊन 2 अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला होताते. त्यावेळी बंकर फुटल्याने आजूबाजूचे गार्डस मृत्यूमुखी पडले होते.
-पुलगावचा शस्त्रसाठा परिसर किंवा दारुगोळा भांडार हा 28 किमीचा परिसर आहे. त्यामुळे या परिसराला मोठं सुरक्षा कवच असतं.
-या परिसरात जवानांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
-इथे शस्त्रसाठ्यासाठी अनेक बंकर केले जातात, यातील प्रत्येक बंकरमध्ये जवळपास 5 हजार किलोपर्यंतचा शस्त्रसाठा असतो.