ठाणे : कोरोना व्हायरसचा दंश नववर्ष स्वागतयात्रानाही बसला आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील स्वागत यात्रा आयोजकांची बैठक आयोजित (Gudhipadwa rally cancel) केली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्वागत यात्रा रद्द करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाच्या स्वागतयात्रा रद्द करण्याचा एकमुखी निर्णय आयोजकांनी (Gudhipadwa rally cancel) घेतला.
बैठकीत उल्हासनगर येथील सिंधी समाजाची चेटीचंद यात्राही रद्द करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला आहे. तसेच नवी मुंबईतील लिजेंड क्रिकेट सामना पाहण्यासाठी काढलेल्या तिकीटाचे पैसे संबंधितांना परत करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी बैठकीत जाहीर केले.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि इतर भागांमध्ये 25 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येतात. त्यापैकी ठाणे आणि डोंबिवली शहरात मोठ्या स्वागतयात्रा निघतात. या स्वागत यात्रेच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक संदेश देण्यात येतो. मात्र, सध्या फोफावत असलेल्या करोना विषाणुचा शिरकाव राज्यासह ठाण्यातही झाला असून या विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेवर करोनाचे सावट असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील सर्वच स्वागत यात्र आयोजकांची तातडीची बैठक बोलविली होती.जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच स्वागतयात्रांचे आयोजक आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांर्भीय सर्वांसमोर मांडले. तसेच ठाण्यात ही कोरोनाचा रुग्ण आढळला असून या आजारवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्वागतयात्रा बाबतही असाच निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्यास प्रतिसाद देत आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पुर्वची स्वागत यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर सर्वच संस्थांनीही अशाचप्रकारे स्वागतयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर काही आयोजकांनी दिपोत्सवाला परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, दिपोत्सवही करू नका, असे आवाहन नार्वेकर यांनी केल्याने आयोजकांनी दिपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर डोंबिवली ग्रामीण भागात होणारी स्वागत यात्र रद्द करुन त्यासाठीचा जो काही खर्च होत होता, तो खर्च यंदा या आजारावर मात करण्यासाठी काही उपाय योजना करता येऊ शकतात त्यासाठी खर्च केला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. त्यानुसार ठाण्यातील कोपीनेश्वर न्यासची स्वागत यात्राही रद्द करणार असून, शहरातील उपयात्रादेखील रद्द करण्यासाठी आम्ही इतर संस्थांना आवाहन करणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे नवी मुंबई येथील क्रीडा प्रेक्षागृहामध्ये सध्या रस्ता सुरक्षा अंतर्गत क्रिकेट सामने सुरु आहेत. मात्र, आता येथील मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. या सामान्याकरिता काढलेल्या तिकीटाचे पैसे संबंधितांना परत दिले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर उल्हासनगर येथील सिंधी समाजाची चेटीचंद यात्राही रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी बैठकीमध्ये घेतला.