मुंबई : बॉलिव़ूडचे बॅडमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन ग्रोवर फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) नवे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार गुलशन ग्रोवर यांना सुभाष घई यांच्या ‘राम लखन’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे या पदावर निवड करण्यात येणार आहे. गुलशन ग्रोवर चार दशके हिंदी सिनेमामध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी 400 पेक्षा अधिक चित्रपटात आपल्या अभिनयांची छाप पाडली आहे. विशेष म्हणजे गुलशन यांनी हिंदी चित्रपटांशिवाय इंग्लिश, फ्रेंच, जर्मन आणि नेपाळी चित्रपटातही काम केले आहे.
करियरच्या सुरुवातीला गुलशन ग्रोव्हर हे अभिनयाचे शिक्षक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक बॉलीवूड मधील कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण दिले आहे. ज्यामध्ये संजय दत्त, विजेता पंडित, सनी देओल, कुमार गौरव आणि टीना मुनीम सारख्या सुपरस्टार कलाकरांना प्रशिक्षण दिले आहे.
याआधी अनुपम खेर या एफटीआयआयच्या अध्यक्षपदावर होते. मात्र त्यांनी 31 ऑक्टोबरला आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अनुपम खेर आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आणि नवीन आतरंराष्ट्रीय शो ‘न्यू अॅम्सरडॅम’चे कारण देत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या नवीन शोची शूटींग चालू असल्यामुळे मला एफटीआयआयच्या मॅनेजमेंट आणि विद्यार्थ्यांना वेळ देता येत नाही असे कारण त्यांनी आपल्या राजीनाम्यात दिलं आहे. अनुपम खेर यांना राजीनामा देऊन एक महीना झाला आहे.
एफटीआयआय संस्थेवर अनुपम खेर यांच्या आधी गजेंद्र चौहान होते. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाने नियुक्ती केली होती. मात्र चौहान यांचं सिनेसृष्टीतील योगदान काय असा सवाल करत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे बराच वाद झाला होता. मात्र तरीही चौहान यांना अभय देण्यात आलं होतं. चौहान यांची मुदत संपल्यानंतर हे पद सुमारे सहा महिने रिक्त होते. या पार्श्वभूमीवर वाद टाळण्यासाठी खेर यांची 2017 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.