वर्धा : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात गारांसह झालेल्या वादळी पावसाने हजारो हेक्टर पीक धोक्यात आलं आहे. शिवाय सेलु तालुक्यातील धपकी येथे सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसात वीज पडल्याने कडूलिंबाच्या झाडाखाली उभे असलेल्या दोघांचा होरपळून घटनास्थळीच मृत्यू झाला.
दुपारच्या वेळी धपकी येथील शेख सत्तार बबन शेख (48) आणि देवीदास कवडू सहारे (15) हे दोघेही शेळ्या आणि गाई चारण्यासाठी गेले होते. वादळ वाऱ्यासह दहा मिनटे गारपीट आणि वीजेच्या गडगडाटामुळे दोघेही कडूलिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने दोघांचाही होरपळून घटनास्थळी मृत्यू झाला.
वशिम शेख हा आपल्या शेतात मक्याचा चारा तोडून घरी जात असताना त्याला दोघेही झाडाखाली मृतावस्थेत आढळले. वशिमने ही घटना गावात सांगताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऐन होळीच्या दिवशी गावातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ऐन होळीच्या दिवशीच जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. समुद्रपूर तालुक्यातील गिरड, वायगाव (गोंड ) कोरा, कांढळी परिसरात गारपीट झाल्याने शेकडो एकरातील रब्बी पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शेतात झाड कोसळल्याने एक बैल ठार झाला, तर पिकांच्या ढिगाला प्लास्टिकने झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
गिरीधर राऊत यांचा शेतात झाडाखाली बांधून असलेला 80 हजार रुपये किंमतीचा बैल आंब्याचे झाड कोसळल्याने दगावला. जिल्ह्याच्या वर्धा, पुलगाव, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा येथेही पावसाने हजेरी लावली.