यवतमाळ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेलं वक्तव्य हे लोकशाहीची थट्टा करणारे असून या देशात पुन्हा राजेशाही आणणारे आहे, अशी टीका बंजारा समाजाचे नेते माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. उदयनराजेंच्या वक्तव्याचा हरिभाऊ राठोड यांनी निषेध केला. (Haribhau Rathod Criticized Udyanraje Bhosale)
मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. त्यांच्या याच मागणीचा माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी समाचार घेतला आहे. उदयनराजेंचं वक्तव्य देशात पुन्हा राजेशाही आणणारं आहे, अशी टीका राठोड यांनी केली.
“आम्ही बहुजन समाजाची लोकं नेहमीच छत्रपतींच्या आदर करतो मात्र खासदार महोदयच असं जर बोलायला लागले तर असं वाटतं की त्यांना परत राजेशाही आणायची आहे. ते यापूर्वीही अनेकदा बोलले आहेत की लोकशाही नको राजेशाही आणा. मग राजेशाहीच आणायची असेल तर आम्हाला देखील विचार करावा लागेल की संविधानाला मानणारे कोण आणि संविधानविरोधी कोण?”, असं राठोड म्हणाले.
“मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे”, अशी खंत उदयनराजेंनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केली.
उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
“मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या.
मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे.
याआधीही मी म्हणालो होतो सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मात्र असं झालं नाही.
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं, त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा”
(Haribhau Rathod Criticized Udyanraje Bhosale)
संबंधित बातम्या
सर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी
सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र