देहरादून : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत. शनिवारी एलओसीवर राजौरी जिल्ह्यातील नौसेरा सेक्टरमध्ये आयईडी डिफ्यूज करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट शहीद झाले. 31 वर्षीय चित्रेश यांचा पुढच्या महिन्यात 7 तारखेला विवाह होता. उत्तराखंडमधील पोलीस निरीक्षकाचे ते चिरंजीव आहेत. देहरादूनमधील त्यांच्या मूळ गावी मेजर चित्रेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सर्वात मन हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे मेजर चित्रेश हे 28 फेब्रुवारीपासून लग्नाच्या सुट्टीवर येणार होते. मुलाच्या अंत्यविधीनंतर प्रतिक्रिया देताना वडिलांचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. ज्या मुलाला हाता-खांद्यावर खेळवलं, त्याला अखेरचा निरोप देताना या बापाची स्थिती अत्यंत वाईट आहे. मेजर चित्रेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
नेहमी घाईतच यायचा.. घाईतच गेला.. अशी प्रतिक्रिया देताना मेजर चित्रेश यांच्या वडिलांचे अश्रू थांबत नाहीत. लहानपणापासून ते अखेरपर्यंतच्या गोष्टी आठवत ते रडत आहेत. रडताना ते म्हणाले, “सोनू, तू नेहमी घाईतच असायचा.. सातव्या महिन्यात जन्म झाला.. दहाव्या महिन्यात चालायला लागलास.. सर्व मित्रांपेक्षा लवकर आर्मीत अधिकारी झालास.. आणि आता लवकरच गेलासही.. हे शब्द कानावर पडताना प्रत्येकाचं मन सुन्न झालं होतं.
मेजर चित्रेश यांच्यासोबत प्रशिक्षण घेणारी त्यांचे मित्रही अनेक आठवणी सांगतात. मेजर चित्रेश हे कधीही कोणत्याच गोष्टीला घाबरायचे नाही. नव्या आव्हानासाठी नेहमी तयार असायचे आणि त्याच्या उत्साहाचं नेहमी कौतुक केलं जायंच, असं मित्र सांगतात.