नवी दिल्ली | 15 फेब्रुवारी 2024 : रेल्वे परिसरात अथवा स्टेशनवर टाईमपास करणारे प्रवासी, फेरीवाले यांच्याविरोधात रेल्वे प्रशासनाने नवी नियमावली आणली आहे. रेल्वे स्टेशन हे प्रवाशी यांच्यासाठी आहे. ते काही प्रेक्षणीय स्थळ नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर येऊन प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या आगंतुकांना आळा घालण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही उद्देशाशिवाय रेल्वे स्टेशनवर येणे हे नियमावलीच्या विरोधात आहे. यापुढे अशा व्यक्तीला जबदरस्त दंड ठोठावला जाणार आहे.
प्रवासी रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी येतात किंवा ट्रेनमधून उतरून त्यांच्या पुढील गंतव्यस्थानी जातात. एक ट्रेन सुटली तर पुढील ट्रेनची वाट पाह्ण्याखेरीज काही प्रवाशांना पर्याय नसतो. तर, काही व्यक्ती प्रवाशांना सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर येतात आणि ट्रेन सुटेपर्यंत स्टेशनवर रेंगाळत असतात. अशा व्यक्तींकडे तिकीट असली तरी त्या व्यक्तीला आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे कोणत्या ना कोणत्या उद्देशाने स्टेशनवर येऊन टाईमपास करणारेही कमी नाहीत. रेल्वे स्टेशन हे काही पाहण्यासारखे ठिकाण नाही. त्यामुळे कोणत्याही उद्देशाशिवाय रेल्वे स्टेशनवर येणे हे नियमावलीच्या विरोधात आहे. अशी व्यक्ती रेल्वे स्टेशनवर आढळल्यास त्याला 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे अशी माहिती उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिली.
अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर गाड्यांची वाट पाहत बसतात. अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की प्रवासी प्लॅटफॉर्मवर चादरी पसरून झोपतात आणि दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडतात. अशाप्रकारे स्थानकात थांबणे मान्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही हेतूशिवाय स्थानकात बसणे, फिरणे हे रेल्वे नियमावलीनुसार गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते. गर्दीच्या स्थानकांवर रेल्वेकडून अशा लोकांवर वेळोवेळी कारवाई केली जाते असेही त्यांनी सांगितले. देशात 7000 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. A, B, C आणि D अशा चार श्रेणीतील ही रेल्वे स्थानके आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.