दहा दिवस पुरेसाच रक्तसाठा, अंतर राखून रक्तदान करा, राजेश टोपेंची कळकळीची विनंती

| Updated on: Mar 23, 2020 | 12:21 PM

तुम्हाला अशक्तपणा येऊन कोरोना होण्याची शक्यता नाही. रक्तदाते आणि ब्लड बँकने हे लक्षात घ्यावं आणि कमी झालेला साठा भरुन काढावा, असंही राजेश टोपे म्हणाले. (Health Minister appeals blood donation)

दहा दिवस पुरेसाच रक्तसाठा, अंतर राखून रक्तदान करा, राजेश टोपेंची कळकळीची विनंती
Follow us on

मुंबई : जमावबंदी आदेश लागू असला, तरी रक्तदान सुरुच राहणे आवश्यक आहे. राज्यात 10 ते 15 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गर्दी टाळून, अंतर राखून रक्तदान करा, अशी कळकळीची विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. (Health Minister appeals blood donation)

‘रक्तदात्यांना नम्र विनंती करेन, जमावबंदी आदेश लागू असेल, तरी रक्तदान सुरुच राहणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम शिथिल करता येणार नाही. त्यामुळे फार गर्दी न करता रक्तदान करा. रक्तदान ही आपली सामाजिक जबाबदारी तर आहेच. पण आजची ही गरज झालेली आहे, वेळेची मागणी आहे.’ असं राजेश टोपे म्हणाले.

‘आपल्याला पूर्वीसारखे मोठे कॅम्प घेता येणार नाहीत, मात्र रक्तदान सुरु ठेवा. जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ‘सामाजिक अंतर’ राखून रक्तदान करावे. ‘ब्लड बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये रक्ताची मोठी कमतरता आहे. आजपासून 10 ते 15 दिवस पुरेल इतकेच रक्त उपलब्ध आहे. इतर ब्लड बँकांनीही सोय करावी.’ असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

‘रक्तदान करताना कोणताही संसर्ग होणार नाही, याची फक्त काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत रक्त देऊ नये, असा कुठलाही नियम नाही. आम्ही याबाबत संपूर्ण अधिकृत माहिती घेतली आहे. तुम्हाला अशक्तपणा येऊन कोरोना होण्याची शक्यता नाही. रक्तदाते आणि ब्लड बँकने हे लक्षात घ्यावं आणि कमी झालेला साठा भरुन काढावा’ असंही राजेश टोपे म्हणाले. (Health Minister appeals blood donation)

“राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज मुंबईत 14 आणि पुण्यात 1 नवीन रुग्ण आढळला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 89 वर गेली आहे. यातील 8 जण संपर्कात आल्याने बाधित झाले, तर 6 जण देशाबाहेरुन प्रवास करुन आले आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“आज फिलिपिन्समधून आलेल्या ज्या नागरिकाचा मृत्यू झाला. तो आधी कस्तुरबामध्ये उपचार घेत होता. त्यानंतर रिलायन्समध्ये उपचार सुरु होते. त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासावा लागेल,” असेही राजेश टोपे म्हणाले.

“ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल, त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं जाईल. हा आजार बरा होतो, आज 89 रुग्ण आहेत, त्यापैकी 1 पुण्याचा आणि 1 मुंबईचा आयसीयूमध्ये आहे” अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

“मीच माझा रक्षक हे महत्त्वाचं आहे. मी स्वत:ची सुरक्षा स्वत: करेन, सुरक्षित अंतर ठेवेन हे महत्त्वाचं आहे,” असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. (Health Minister appeals blood donation)