कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी, राज्य सरकार तरीही सज्ज : आरोग्यमंत्री टोपे

| Updated on: Nov 02, 2020 | 4:26 PM

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी, राज्य सरकार तरीही सज्ज : आरोग्यमंत्री टोपे
Follow us on

जालना : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. दुसऱ्या लाटेची शक्यता असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे, असं राजेश टोपे म्हणाले. (Health Minister Rajesh Tope on Corona Second Wave)

“सध्या युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. या संदर्भातल्या बातम्या आपण ऐकतो आहोत. साहजिकच आपल्याकडे देखील कोरोनाची दुसरी लाट येईल का अशी चर्चा सुरु आहे. मात्र आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून आपण मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू सर्व अनलॉकिंग करायला सुरु केलं आहे. टप्प्याटप्प्याने सर्व सुरु होत आहे. याआधी लग्नसमारंभात 50 लोकांना परवानगी दिली होती. आता या संख्येत देखील वाढ करण्याचा विचार सरकार करत असल्याचं टोपे यांनी सांगितलं. दिवाळीनंतर यावर सरकार निर्णय घेणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं.

“दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं. सरकारने घालून दिलेले नियम-अटी महत्त्वाच्या आहेत. मास्क वापरणं गरजेचं आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे”, असं टोपे म्हणाले.

दुसरीकडे मंदिरे उघडण्याच्या मागणीवर गेले अनेक दिवस विरोधक आंदोलन करत आहेत. लवकरात लवकर मंदिरे उघडली गेली पाहिजेत, अशी मागणी विरोधक करत आहेत. यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले, “आम्हालाही मंदिरं बंद राहावेत असं वाटत नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता दिवाळीनंतर मंदिरं उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील”.

(Health Minister Rajesh Tope on Corona Second Wave)

संबंधित बातम्या

NHM Scam | देवेंद्र फडणवीस म्हणतात तशी वस्तुस्थिती नाही, राजेश टोपेंनी आरोप फेटाळले

अजितदादांची तब्येत उत्तम, सध्या त्यांना कुठलाही त्रास नाही, कार्यकर्त्यांनी चिंता करु नये : राजेश टोपे