वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या भयंकर थंडी पडली आहे. तेथील 12 राज्यांना या थंडीचा फटका बसला आहे. यामुळे अमेरिकेतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमेरिकेत अंटार्क्टिकापेक्षा जास्त थंडी पडली आहे. अमेरिकेतील काही राज्यात शून्य ते -30 डिग्रीपेक्षा खाली तापमान गेले आहे. तर -70 डिग्रीपेक्षा तापमान जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तर ध्रुवाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असल्याने थंड हवा सुटली आहे. यामुळे याचा परिणाम तेथील राहणाऱ्या लाखो लोकांवर होत आहे. थंडीमुळे तेथील विमान सेवा सुद्धा खंडीत करण्यात आली आहे. अमेरिकेच्या दोन एअरपोर्टवरुन उडणाऱ्या 1500 विमानं रद्द करण्यात आली आहे. याशिवाय रेल्वे सेवाही खंडीत करण्यात आली आहे. यासोबतच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाला ब्रेक लागला आहे. अलास्का शहरात अंटार्कटिकापेक्षा जास्त थंडी पडली आहे. काही तज्ञांच्या मते अमेरिकेतील शिकागोमध्ये -32 पर्यंत तापमान गेले पोहचले आहे.
हवामान खात्याने अमेरिकेत आणखी जास्त थंडी आणि तापमान -70 डिग्रीपर्यंत जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे तेथील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागातून करण्यात आले आहे. याच दरम्यान तेथील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून बाहेर न निघण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेत थंडीने इतका कहर केला आहे की, आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील विसकॉन्सिन, मिशिगन, इलनॉय, मिसिसिपी, अलबामा, मिनिसोटा, नॉर्थ डकोटा, कंसास, मिसौरी आणि मोंटानामधील लोकांवर या थंडीचा परिणाम जास्त दिसून येत आहे.
संपूर्ण अमेरिकेतील 2700 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच अमेरिकेतील पोस्टल सर्व्हिसही बंद करण्यात आली आहे. या थंडीचा परिणाम अमेरिकेतील 21 कोटी लोकांवर पडणार आहे. कारण येथील तापमाना आणखी घट होण्याची शक्यता दिसत आहे. काही भागात भयंकर अशी ठंडी पडल्याने पोलिसांनी काही लोकांना आपली दुकानं बद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लोकांना त्रास नको, म्हणून काही ग्रोसरी आणि मेडिकल स्टोअर सुरु ठेवण्यात येणार आहेत. अमेरिकेतील विसकॉन्सिन, मिशिगन आणि इलनॉयमध्ये भयंकर थंडी पडल्यामुळे तेथील परिस्थिती सध्या आपतकालीन म्हणून घोषीत केली आहे.