मुंबई : महाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस सुरु आहे (Maharashtra Rain). मात्र, जाता-जाताही पावसाने राज्यात धुमाकुळ घातला आहे. नाशिक, पुणे, मुंबईला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. आता पुढील आठवडा देखील पावसाचा असणार आहे. 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात ढगाळी हवामानासह वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे (Heavy Rain In Maharashtra).
नाशिक सह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता आहे (Maharashtra Rain). तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यासह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 ऑक्टोबरपर्यंत असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल.
वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. या हवामानाच्या स्थितीनुसार, शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपार नंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावं. वादळ आल्यास लोकांनी झाडाखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असं आवाहनही करण्यात येत आहे.
VIDEO :