मुंबई : राज्यभरात परतीच्या पावसाने (Heavy Rain in Maharashtra) जोरदार हजेरी लावली आहे. नांदेडमध्ये मागील 2 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी (Heavy Rain in Maharashtra) लावली आहे. सातत्याने होणाऱ्या पावसाने कधी नाही ते यंदा पहिल्यांदाच ऐन दिवाळीत पावसाळ्याचा भास निर्माण झाला आहे. या पावसामुळे गोदावरी नदी सध्या धोक्याच्या पातळीजवळ गेली आहे. नांदेड शहरातील गोदावरी नदीवरचा नावघाट पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या नांदेडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प देखील तुडुंब भरला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत पहिल्यांदाच गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आहे. नांदेड शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी सध्या धोक्याच्या पातळीवर आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये देखील जोरदार पाऊस असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. दिवाळीचे दिवस सुरू असताना आज सिल्लोड ते अजिंठा रस्त्यावर अवजड वाहने जागोजागी चिखलात फसली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. 2 तासांपासून वाहनांना वाट मोकळी करून देण्यासाठी क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने मोठी वाहने काढण्याचे प्रयत्न सुरू होते. चिखलाने वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना तासंतास ताटकळत चिखल तुडवत बाहेर पडावं लागलं.
जालन्यात सलग 7 दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. जालना शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र, या पावसाने सोयाबीन, मक्का, कापुस या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पीक सोयाबीन असून सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र येथे देखील मागील 8 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतात पाणी साचलं आहे. दुसरीकडे काढलेल्या सोयाबीनला पावसाने अंकुर फुटत आहेत. दरम्यान नुकसानीचे पंचनामे सुरू असून अद्याप नेमकं किती नुकसान झालं हे समजू शकलेलं नाही.
बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे भीषण सावट होते. पाऊसच नसल्याने खरिपाची लागवड अत्यल्प होती. पाण्याअभावी ज्यांनी पीकं पेरली त्यांचंही नुकसान झालं. मात्र, परतीच्या पावसाने बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वात जास्त पाऊस माजलगाव परिसरात झाला असून नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. आठवडाभरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतातील ज्वारीच्या पिकांना मोठा धोका निर्माण झाला. या पावसामुळे आणि आठवडाभर सूर्याने दर्शन न दिल्याने शेतातील ज्वारीच्या कंणसांना कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात राहणार असल्याचं चित्र आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला भात शेती आणि अन्य पीकांचा घास हिराऊन घेतला आहे. पिकांची मोठी नासाडी झाली आहे. शेतात कापलेलं पीकही वाया गेलं आहे. तसेच शेतात उभं असलेलं पीकही पावसाने कापता येणे अशक्य झालं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.