पावसाचे धूमशान, मुंबईकरांनो सावधान,समुद्राच्या लाटा 10 फूटांची उंची गाठणार

| Updated on: Jul 20, 2024 | 3:50 PM

गेल्या काही दिवसात तुळशी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे दिली आहे.

पावसाचे धूमशान, मुंबईकरांनो सावधान,समुद्राच्या लाटा 10 फूटांची उंची गाठणार
gateway of india, heavy rain in mumbai
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गेले दोन ते तीन दिवस राज्याला मान्सूनचा तडाखा बसत आहे. मुंबई कोकण किनारपट्टीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सातत्याने पावसाचा मारा सुरु असल्याने शहरातील सखल भागात रात्रीपासून पाणी साचले आहे. मुंबईत 20 आणि 21 तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा वेध शाळेने दिला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांना धोकादायक पातळी ओलांडली आहे. मुंबईत रात्रीपासून सलग पाऊस कोसळत आहे.20 जुलै रोजी रात्री समुद्रात रात्री नऊ वाजताच्या दरम्यान भरती असल्याने समुद्र किनाऱ्यावर आठ ते दहा फूटांच्या लाटा उसळ्याचा अंदाज आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्राच्या भरती वेळी मुंबईतील ब्रिटीशकालीन पर्जन्यवाहीन्यांची झाकणे बंद केली जातात. कारण समुद्राचे पाणी उलटे शहरात येते. त्यामुळे जर या काळात मोठी पर्जन्यवृष्टी झाली तर मुंबई बुडते हे दरवर्षीचे गणित आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा 21 ते 22 जुलैनंतर कमी होत जाणार आहे. तरीही त्याचा प्रभाव 25 ते 26 जुलै पर्यंत राहणार आहे. त्यामुळे आणखी 4 ते 5 दिवस पाऊसाचा मुक्काम राहणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जुलै महिन्याची सरासरी ओलांडून नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. मरिन ड्राईव्ह, वरळी सी फेस,वरळी कोळीवाडा, माहिम – दादर चौपाटी, तसेच आजूबाजूच्या परिसरातील येथील अनेक चौपाट्यांवरील घरांतघरात लाटांच्या धडकांनी पाणी गेले आहे. मुंबईतील अंधेरी मिलन सबवे, कुर्ला नाला, मिठी नदी तसेच सखल भागात पाणी साचले आहे.

येथे पहा ट्वीट,  तुळशी तलावाचा व्हिडीओ –


तुळसी तलाव भरुन वाहू लागला

1879 मध्ये 40 लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता तुळशी तलाव दुथडी भरुन वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव आहे.  मुंबई पालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि पालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी पालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दि. 20 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्यावर्षी देखील 20 जुलै रोजीच मध्यरात्री 1.28 वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता.

तुळशी तलावाची जलधारणा क्षमता 804.6 कोटी लीटर आहे.  हा तलाव साल 2022 आणि 2021 मध्ये दिनांक 16 जुलै रोजीच ओसंडून वाहू लागला होता.  तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच साल 2020 मध्‍ये दिनांक 27 जुलैला तो भरला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो.

गेट  वेटचा खवळलेला समुद्राचे ट्वीट येथे पाहा –

तुळशी तलावाची महत्त्वाची माहिती

√  मुंबई पालिका मुख्यालयापासून साधारणपणे 35 किलोमीटर (सुमारे 22 मैल) अंतरावर हा तलाव आहे.

√ या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन1879 मध्ये पूर्ण झाले.

√ या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

√ या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.76 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे1.35 चौरस किलोमीटर एवढे असते.

√ तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा 804.6 कोटी लीटर एवढा असतो (8046 दशलक्ष लीटर)

√ तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.