सोलापूर : तुळशी विवाहनंतर सर्वत्र लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अशातच सोलापुरातील करमाळा येथे एका शेतकऱ्याने आपल्या मुलीची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधून (Helicopter in farmers daughter wedding) केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. शिवाजी पाटील असं या शेतकऱ्याचे नाव आहे.
शिवाजी पाटली यांनी आपल्या मुलीच्या लग्नात ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’चा संदेशही दिला. तसेच मुलीच्या लग्नाची पत्रिकाही त्यांनी कागदाची न छापता थेट हात रुमालावर पत्रिका छापली आहे. जेणेकरुन लोका हात रुमालाचा वापर करतील आणि मुलीच्या लग्नातील आठवण सर्वांच्या लक्षात (Helicopter in farmers daughter wedding) राहील.
करमाळ्यातील कंदरमधील शिवाजी पाटील यांची कन्या स्नेहल हिचा विवाह इंदापूर तालुक्यातील बालेवाडीमधील कांतीलाल जामदार यांचे पुत्र अक्षय याच्याशी आज (2 डिसेंबर) झाला.
शिवाजी पाटील हे शेतकरी आहेत. वडीलोपार्जित ते शेतीचे काम करतात. मुलीचं लग्न ठरल्यानंतर स्वत: च्या मुलीचा विवाह सर्वांच्या आठवणीत राहावा म्हणून त्यांनी मुलीची पाठवणी थेट हेलीकॉप्टरने केली. मुलगी असली तरी तिची हौस करण्यात कुठेही कमी पडायच नाही अशीच इच्छा पाटील कुटुंबाची होती.
दरम्यान, कंदर गावात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर आल्याने गावात ते पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी या लग्नसोहळ्यालाही हजेरी लावली. गावात सर्वत्र या लग्नाची चर्चा सुरु आहे.