मुंबई : “परीक्षा जाहीर केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी घेतली जाणार नाही. पूर्ण सप्टेंबर महिना अभ्यासासाठी दिला जाईल आणि ऑक्टोबरचा पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायला सुरुवात होईल,” अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच या परीक्षांचे निकाल काही विद्यापीठ 31 ऑक्टोबरपर्यंत तर काही विद्यापीठ हे 10 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परीक्षा कशी घ्यावी याबाबत एक समिती नेमण्यात आली आहे. आज या समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि राज्यातील कुलगुरुंची बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षा नेमकी कशी असेल, वेळापत्रक, निकाल याबाबतची माहिती देण्यात आली. (Uday Samant on Final Year exam)
“राज्यातील सर्व विद्यापीठातील 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहे. त्या सर्वांची परीक्षा घ्यायची आहे. त्यामुळे विद्यापीठांनी शासनाला यूजीसीकडे 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी, अशी विनंती केली आहे. तर काही विद्यापीठांनी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मागावी, असे सांगितले आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे उदय सामंत म्हणाले.”
“परीक्षांबाबत परवा कुलगुरुंची 12 वाजता बैठक होईल. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन समितीची 4 वाजता बैठक होईल. त्यानंतर जो निर्णय होईल तो शासनासमोर मांडण्यासाठी शेवटची बैठक घेऊ,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी पूर्ण सप्टेंबर महिना दिला जाईल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा कशा पद्धतीने, कोणत्या सोप्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत समिती आपला प्रस्ताव या बैठकीत सादर करणार आहे. या बैठकीत वेळापत्रकाबाबत आखणी करु आणि मुख्यमंत्र्यांकडे माहिती देऊ,” असेही ते म्हणाले.
“काही विद्यापीठे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल लावतील. विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यांनी घरातच राहून परीक्षा द्यावी याबाबत कुलगुरूंचे एकमत झालं आहे,” असेही उदय सामंतांनी सांगितले. (Uday Samant on Final Year exam)
“कोरोनाच्या काळात परीक्षा घेणं जिकरीचे आहे. पण कुलगुरू ते योग्य पद्धतीने पार पाडतील. परीक्षा कमी मार्कांची असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही. विद्यार्थी घरीच सुरक्षित कशी परीक्षा देऊ शकतील याबाबत आम्ही विचार करतो आहे. विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घेऊ,” असेही उदय सामंत म्हणाले.
दरम्यान काही कुलगुरुंनी सूचनांसाठी अजून एक दिवसांचा कालावधी मागितला आहे. त्यानंतर परीक्षा आणि निकालाची तारीख, एटीकेटीचं काय यासंदर्भात निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
“ऑनलाईन परीक्षांमध्ये अनेक प्रकार आहेत. MCQ, OMR किंवा असाईनमेंट पद्धतीमधून परीक्षा घेता येईल का
याबाबत चर्चा करुन निर्णय घेऊ,” असेही उदय सामंतांनी सांगितले. (Uday Samant on Final Year exam)
संबंधित बातम्या :