लेखी आश्वासनानंतर हिंगणघाटच्या लेकीवर अंत्यसंस्कार

| Updated on: Feb 10, 2020 | 6:06 PM

हिंगणघाटमध्ये जळीतकांडात जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी (Hinganghat Burn Victim Teacher Death) ठरली.

लेखी आश्वासनानंतर हिंगणघाटच्या लेकीवर अंत्यसंस्कार
Follow us on

वर्धा : हिंगणघाटमध्ये जळीतकांडात जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी (Hinganghat Burn Victim Teacher Death) ठरली. आज (10 फेब्रुवारी) सकाळी पीडित तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर संध्याकाळी 5 च्या सुमारास तिच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या कुटुंबियांसह महाराष्ट्रातील जनतेलाही अश्रू अनावर झाले.

हिंगणघाटच्या लेकीचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत आणण्यात आला. तेव्हा नागरिकांनी विविध मागण्या ठेवत अंतिम संस्कार थांबवले होते. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी तीन लेखी आश्वासनं लिहून दिली.

  • हिंगणघाटच्या पीडित तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. यानंतर आरोपी विकेश नगराळे यांच्या विरुद्ध फास्ट ट्रक कोर्टात प्रकरण चालवण्यात येईल
  • सदर प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज 10 फेब्रुवारीला ट्विटरवर आश्वासन दिले की, मृतकाच्या भावाला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सरकारी नोकरी देण्यात येईल. त्या अनुषंगाने मृतकाच्या भावाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सराकारी नोकरी लवकरात लवकर देण्यात येईल.
  • मृतकाच्या कुटुंबियाला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात येते.

उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पीडितेच्या कुटुंबाला ही तीन आश्वासन देण्यात आली. ही आश्वासन दिल्यानंतर हिंगणघाटच्या लेकीवर अंत्यसंस्कार करण्यात (Hinganghat Burn Victim Teacher Death) आले.

पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील 24 वर्षीय पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने पहाटे तरुणीची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेते पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आहेत (Hinganghat Teacher Death).

पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. संसर्गामुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. ‘सेप्टीसेमिक शॉक’ असं तिच्या मृत्यूचं वैद्यकीय परिभाषेतील कारण डॉक्टरांनी सांगितलं.