Crime | पोलिसांची मुलंच वाँटेड लीस्टमध्ये! हिंगोलीत गुंडगिरीचा कळस, प्रशासनाची झोप उडाली, नागरिकांचा संताप

| Updated on: Mar 09, 2022 | 12:09 PM

सदर आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलिसांच्या वतीने योग्य बक्षीससुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. या पाच आरोपींच्या विरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसात 307, 143, 147, 148, 149 , 326 , 324, 447, 504, 506 आणि ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

Crime | पोलिसांची मुलंच वाँटेड लीस्टमध्ये! हिंगोलीत गुंडगिरीचा कळस,  प्रशासनाची झोप उडाली, नागरिकांचा संताप
हिंगोली शहरातील वाँटेड आरोपींचे फोटो
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

हिंगोली: शहरातील गुन्हेगारीच्या घटनांनी (Hingoli crime) गेल्या काही महिन्यांपासून कळस गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. शहरात गुंडगिरी करणाऱ्या आरोपींची पोस्टर्स (Most Wanted) शहरभर लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या चार आरोपींमध्ये 2 आरोपी हे शहरातील हेड कॉन्स्टेबलची मुलं आहेत, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांचीच मुलं वाँटेडच्या लीस्टमध्ये लागल्यामुळे नागरिकांकडून संताप आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर कायदा सर्वांसाठी समान आहे, याचा दाखला पोलिस प्रशासनाकडून (Hingoli police) देण्यात आल्याचंही यातून दिसून येत आहे.

हिंगोलीत गुंडगिरी शिगेला

हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भर दिवसा लूटमार खून दरोड्याच्या घटनेने हिंगोली गाजत राहीली. याच काळात बँक लुटण्याचा, शेतकरी बाजार लुटण्याचा, बँक कर्मचाऱ्याच्या घरात जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, धूम स्टाईलने पैसे पळविण्याच्या घटनांनी जिल्हा गाजला. वाढती वाळू चोरी मटका जुगार राजरोस सुरू असल्याने हिंगोलीच्या आमदारांनी लाक्षणिक उपोषण सुद्धा केले. व्यापारी आणि नागरिकांनी पोलिसांच्या विरोधात एक दिवसीय बंद पाळून हिंगोली पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविला. त्यानंतर मात्र पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.

23 फेब्रुवारीच्या घटनेतील वाँटेड आरोपी

23 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 च्या सुमारास हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या बेलवाडी शिवारातील तानाजी बांगर यांच्या शेतात शिवम सुरेश कुरील आणि त्याचे मित्र गेले होते. जुन्या वादातून आरोपी सागर काळे, विक्की काळे, अभय चव्हाण, अक्षय गिरी आणि करण राजपूत यांनी शिवमवर कत्ती तलवार, लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याच्या डोक्यावर, कपाळावर, पायावर घाव घालून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करीत त्याचा पाय मोडला. तसेच साक्षीदार तानाजी बांगर यांना ही बेदम मारहाण केली. त्यावरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याच्या प्रयत्नासह 10 ते बारा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. 5 पैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर चार फरार आरोपींना वाँटेड घोषित केले आहे. चारही फरार आरोपींची पोलिसांनी हिंगोली शहरात वाँटेड म्हणून पोस्टर लावली आहेत. विशेष बाब म्हणजे या पैकी विकी काळे आणि सागर काळे ही दोन आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांची मुले असल्याचं जखमी शिवमने सांगितलं.

माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

सदर आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलिसांच्या वतीने योग्य बक्षीससुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. या पाच आरोपींच्या विरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसात 307, 143, 147, 148, 149 , 326 , 324, 447, 504, 506 आणि ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. कायदा आणि सुवव्यवस्था पाळण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे. त्यांचीच मुलं जर कायदा हातात घेत असतील तर सामान्यांना दोष देऊन तरी काय फायदा होणार आहे. त्यामुळे पोलिसांप्रमाणे पोलिसांच्या मुलांनी ही कायदा आणि सुवव्यस्था पाळायालाच हवा असा सूर सर्वसामान्य नागरिकांतून निघू लागलाय…

इतर बातम्या-

Aurangabad | ब्लॅक लीस्टमधल्या ठेकेदाराला वाळूचे कंत्राट, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना खंडपीठाची नोटीस

नागपुरातील सुप्रसिद्ध ‘परम का ढाबा’च्या संचालकांची आत्महत्या, 36 व्या वर्षी टोकाचं पाऊल