नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु केल्यानंतर, दहशतवादी संघटनांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या धास्तावलेल्या अवस्थेत दहशतवाद्यांनी आता पुन्हा एकदा भारतावर सुसाईड बॉम्बरद्वारे हल्ल्याची धमकी दिली आहे. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरनं 17 मिनिटांचा ऑडिओ जारी करत, भारतात पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी दिली.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेली धडक कारवाईनंतर चिडलेल्या हिजबुल मुजाहिद्दीननं ही धमकी दिली. हिजबुल मुजाहिद्दीनचा ऑपरेशनल कमांडर रियाझ नायकू यानं धमकीचा ऑडिओ जारी केला. ज्यात त्यानं स्थानिक युवकांच्या मदतीनं भारतात पुलवामासारखे आणखी आत्मघाती दहशतवादी हल्ले घडवण्याची धमकी दिली.
पुलवामा हल्ल्याच्या 100 तासांच्या आत भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड राशीद गाझी आणि त्याच्या एका साथीदाराला कंठस्नान घातलं. त्यानंतर थेट पत्रकार परिषद घेत, भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांना काश्मीर सोडण्याचा इशारा दिला. त्यामुळं भारतीय सैनिकांच्या कठोर कारवाईनं करा किंवा मराची भूमिका स्वीकारत हिजबुल मुजाहीद्दीननं भारताला शरण जाण्यापेक्षा, आत्मघाती हल्ले करुन मरणं पसंत असल्याचं जाहीर केलं.
शरण जाणार नाही
काश्मीरमध्ये भारतीय सैन्य स्थानिक लोकांवर अन्याय करत असल्याचा कांगावा करत रियाझ नायकूनं 17 मिनिटांच्या या ऑडिओ संदेशात, भारत सरकार जोपर्यंत काश्मीरमधून सैन्य हटवत नाही, तोपर्यंत हल्ले सुरूच राहतील अशीही धमकी दिली.
सैन्य हटत नाही तोपर्यंत हल्ले करत राहू
आधी केवळ जैश-ए-मोहम्मदने अशी जाहीर हल्ल्याची धमकी दिली होती. पण, पुलवामानंतर जैशचा काश्मीरमधी कमांडरच्या खात्म्यानंतर आता हिजबुल मुजाहिद्दीननं शेवटची धडपड सुरू केल्याचं चित्रं आहे. त्यामुळं आता हिजबुलही खुलेआमपणानं आत्मघाती हल्ल्यांची धमकी देत आहे. त्यांच्या या धमकीनं दहशतवादी संघटना स्थानिक युवकांना कशा गळ घालून आत्मघाती बॉम्बर बनवतात, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यामुळं काश्मिरी तरुणांची माथी भडकवणाऱ्या या दहशतवादी संघटनांचा मुळासकट नायनाट करणं अत्यंत गरजेचं बनलं आहे, हेच यावरुन स्पष्ट होत आहे.