मुंबई : “योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात. आज त्यांच्याच राज्यामध्ये जंगलराज आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”, असा सणसणीत टोला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हाथरस प्रकरणावरून योगींना लगावला आहे. (Home Minister Anil Deshmukh Slam Yogi Adityanath over Hathras Rape Case)
“पीडित मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची जीभ कापण्यात आली , तसंच तिच्या पाठीचा कणा देखील त्यांनी मोडला. 10 दिवस तिचे कुटुंबीय एफआयआर देण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांचा एफआयआर देखील घेतला गेला नाही. योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात आज त्यांच्या राज्यामध्ये जंगलराज आहेत. त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”, असा निशाणा गृहमंत्र्यांनी योगींवर साधला.
“सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांचा अतिशय योग्य तपास सुरू असताना एकाएकी तो तपास सीबीआयकडे देण्यात आला. सीबीआयच्या चौकशीकडे आमचं लक्ष आहे. सुशांत सिंह राजपूतचा खून झालाय की त्याने आत्महत्याच केली, याचा खुलासा सीबीआयने लवकरात लवकर केला पाहिजे”, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.
“गेली 2 महिने ज्या पद्धतीने सुशांत प्रकरणावरून राजकारण झालं त्यावरून महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम एका पक्षाने केलं”, असं म्हणत त्यांनी भाजपचं नाव न घेता निशाणा साधला. तसंच बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खालच्या दर्जाचं राजकारण एका पक्षाने केलं, असा आरोप करत त्याचा मी निषेध करतो, असं अनिल देशमुख म्हणाले.
हाथरस बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. दिल्लीतील सफदरजंग रुगणालयात पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी (29 सप्टेंबर) उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा
पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला.
(Home Minister Anil Deshmukh Slam Yogi Adityanath over Hathras Rape Case)
संबंधित बातम्या
Hathras Case | योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज?; रुपाली चाकणकर भडकल्या
उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू
नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा