अहमदनगर : पारनेर येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. यात मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली. त्यामुळे तिचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. ही घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली.
पीडित तरुणाला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना अटक केली आहे. यात मुलीच्या मामांचाही समावेश आहे. मुलीचे वडील रामा रामफल भरतीया हे मात्र अद्याप फरार आहेत.
दरम्यान, पीडित मुलीचे नाव रुक्मिणी रणसिंग असे आहे, तर मुलाचे नाव मंगेश रणसिंग असे आहे. या दोघांनी 6 महिन्यांपूर्वीच आंतरजातीय लग्न केले होते. मात्र, या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. अखेर विरोध डावलून लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलीचे मामा आणि वडिलांनी मुलीसह जावयाला ढवळे वस्ती येथे घरात कोंडले. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. यात दोघेही मोठ्या प्रमाणात भाजले. मुलीचा उपचारदरम्यानच मृत्यू झाला. मुलाची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मुलीचे वडील फरार असून मामाला अटक केली आहे. हे सर्व उत्तरप्रदेशचे रहिवासी असून कामानिमित्त अहमदनगरला आले आहेत. मामा सुरेंद्रकुमार बाबूलाल भरतीया आणि घनश्याम मोहन सरोज अटक यांना अटक करण्यात आली आहे.