Ashok Chavhan | काँग्रेसमध्ये अर्ध्याहून अधिक आयुष्य घालवलेले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले अशोक चव्हाण यांनी सोमवारी, 12 फेब्रुवारीला पक्षाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली. काँग्रेससोबतच 50 वर्षांच असलेलं नातं संपवल्यानंतर मंगळवारी अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात गेले. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये बरीच खळबळ माजली. पक्षनेतृत्व संघटना मजबूत करण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत आपण काँग्रेसवर खुश नसल्याचं चव्हाण पक्ष सोडल्यावर म्हणाले. मात्र, आपल्या ज्योतिषाच्या सांगण्यावरून 66 वर्षीय चव्हाण यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेऊन अशोक चव्हाण यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय समस्यांवर चर्चा केली होती. महंतांनी त्यांच्यासाठी शास्त्रानुसार तीन महिने नियम तयार केले. चव्हाण यांनी त्या नियमांचे संपूर्ण निष्ठेने पालन केले. शेवटी महंतांनी चव्हाण यांना त्यांचा राजकीय संबंध बदलण्याचा, “परिवर्तन” करण्याचा सल्ला दिला. अशोक चव्हाण यांनीही त्या सल्ल्याचे पालन केले. TV9 नेटवर्कच्या प्लॅटफॉर्म न्यूज 9 प्लसशी बोलताना महंत अनिकेत शास्त्री यांनी स्वतः ही गोष्ट मान्य केली आणि ‘मी त्यांना पक्ष बदलण्याचा सल्ला दिला होता’ असे सांगितले. कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यास किंवा स्वत:ची संघटना सुरू करण्यास ते मोकळे होते, असे त्यांनी नमूद केले.
ज्योतिषशास्त्रानुसार शुभ काळ
अशोक चव्हाण यांनी सोमवार, 12 फेब्रुवारीला विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी महंत अनिकेत शास्त्री रविवारी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी राजीनाम दिला तसेच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. चव्हाण यांनी राजीनामा देऊन नव्या पक्षात प्रवेश करण्यासाठी महंतांनी एक मुहूर्त (शुभ मुहूर्त) निश्चित केला होता. विशेष म्हणजे, अशोक चव्हाण यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना राजीनाम्याचे जे पत्र लिहीले होते, त्यातील काही शब्दांमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहीलं होतं की – ‘मी 12 फेब्रुवारी दुपारपासून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.’ त्यांच्या या पत्रात दुपारच्या वेळेचा हा उल्लेख असामान्य किंबहुना अनपेक्षितच होता. मात्र वेळेच्या या उल्लेखाचा संबंध ज्योतिषाच्या सल्ल्याशी असल्याचे आता स्पष्ट झाल आह.
महंत अनिकेत शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते 2 या दरम्यानची वेळ निश्चित केली होती. याला अभिजात मुहूर्त म्हणतात. या काळात जी व्यक्ती, एखाद्या नवीन गोष्टीला सुरूवात करेल, त्याला त्यामध्ये मोठं यश नक्कीच मिळेलं.
राजकीय उत्तराधिकारी
महंत अनिकेत शास्त्री हे महाराष्ट्रातील धार्मिक वर्तुळातील एक आदरणीय व्यक्ती आहेत. महंत हे 12 वर्षांचे होते, तेव्हापासूनच ते अशोक चव्हाण यांना ओळखतात. महंतांचे गुरु राघव शास्त्री कर्वे यांच्याकडून अशोक चव्हाण हे सल्ला घेत असत. त्यावेळी महंत हे गुरुजींनी अशोक चव्हाण यांना ज्योतिषशास्त्राबाबत दिलेले उपदेश टिपून ठेवत असत. “चव्हाण साहेब धार्मिक व्यक्ती आहेत. आमच्या दीर्घ सहकार्यामुळे आमचे संबंध अधिक दृढ झाले आहेत” असे 30 वर्षीय महंत यांनी नमूद केले.
अशोक चव्हाण यांच्या जुळ्या मुलींपैकी धाकटी असलेली श्रीजया या चव्हाण यांचा राजकीय वारसा पुढे नेतील अशी भविष्यवाणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.2022 मध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान मराठवाड्यात यशस्वीपणे समन्वय साधल्यानंतर श्रीजया प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आगामी निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांची जागा श्रीजया घेणार असल्याची चर्चाही आहे.
सत्य साईबाबांचे भक्त
अशोक चव्हाण आणि त्यांचे वडील, दिवंगत शंकरराव चव्हाण हे स्वर्गीय गुरू सत्यसाईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. आंध्र प्रदेशातील पुट्टापर्थी येथील सत्य साईबाबांच्या समाधीने प्रेरित होऊन, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानाचे नाव ‘आनंद निलायम’ असे ठेवले आहे. त्या समाधीला प्रशांती निलयम म्हणतात. 28 ऑक्टोबर 2010 रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांनी सत्य साईबाबांना त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भव्य पूजा समारंभासाठी आमंत्रित केले होते. दोन दिवसांनी चव्हाण यांचे नाव आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यात समोर आले. अवघ्या आठवडाभरानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.