चंदीगड: दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांमुळे आता केंद्र सरकार अधिकच कोंडीत सापडले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला (Farmers protest) आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखबीरसिंग बादल (Sukhbir Badal) यांनी भाजपवर हल्ला चढवला. या आंदोलनातील शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Shiromani Akali Dal chief Sukhbir Badal slams BJP over farmers protest in Delhi)
सुखबीरसिंग बादल यांनी गुरुवारी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर आगपाखड केली. मुळात भाजप किंवा अन्य कोणालाही अशाप्रकारे कोणालाही देशद्रोही ठरवण्याचा हक्क आहे का? या शेतकऱ्यांनी संपूर्ण आयुष्यभर देशाची सेवा केली आणि आता तुम्ही त्यांना देशद्रोही ठरवत आहात. त्यामुळे शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणारे लोकच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका सुखबीरसिंग बादल यांनी केली.
शेतकरी आंदोलनात पंजाबमधील अनेक वृद्ध महिला शेतकरी सहभागी झाल्या आहेत. त्या तुम्हाला खलिस्तानी वाटतात का? शेतकऱ्यांना अशाप्रकारे देशद्रोही ठरवणे हा त्यांचा अपमान आहे. भाजपची अशी हिंमतच कशी झाली, असा सवालही सुखबीरसिंग बादल यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांनी केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या आंदोलनला पंजाबमधून मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांनी केंद्राचा पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. तर अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह ढिंढसा यांनी आपला पद्मभूषण पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा केली आहे.
याशिवाय, पंजाबमधील अनेक नामवंत माजी खेळाडूही शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनीही अवॉर्ड वापसी मोहीम हाती घेतली आहे. भारताचे माजी बास्केटबॉल खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेते सज्जच सिंह चिमा हे गेल्या दोन दिवसांपासून अर्जुन आणि पद्म पुरस्कार विजेत्या पंजाबमधील खेळाडूंशी पुरस्कार वापसी मोहीमेसाठी संपर्क करत आहेत. चिमा यांना अनेक पुरस्कार विजेत्या 30 खेळाडूंची साथ मिळाली आहे.
संबंधित बातम्या:
पंजाबमधील खेळाडूंचा शेतकरी आंदोलनाला भक्कम पाठिंबा, कृषी कायद्याविरुद्ध ‘अवॉर्ड वापसी’ मोहीम
कृषी कायद्यातील सर्वाधिक वादग्रस्त क्लॉज कोणता?; पी. साईनाथ म्हणतात…
(Shiromani Akali Dal chief Sukhbir Badal slams BJP over farmers protest in Delhi)