मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 11’ मध्ये अमरावतीच्या बबिता ताडे (KBC 11 Babita Tade) यांनी कोट्यधीश होण्याचा मान मिळवला. परंतु बबिता ताडे खरोखरच कोट्यधीश झाल्या आहेत का? त्यांच्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा झाली, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
खात्यात किती रुपये जमा होतात?
कोट्यधीश झालेल्या बबिता ताडे यांच्या बँक खात्यात नेमके किती रुपये जमा झाले याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल. अनेकांनी गुगल, यूट्यूबवर याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नही केला असेल. मात्र याचं उत्तर आता समोर आलं आहे.
ताडे यांनी जिंकलेल्या एक कोटी रुपयांवर 33 टक्के टॅक्स लागेल. त्यामुळे जवळपास 67 लाख रुपये बबिता ताडेंच्या (KBC 11 Babita Tade) बँक खात्यात जमा होतील. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांनी ही रक्कम अकाऊंटमध्ये जमा होणार आहे.
केबीसीमध्ये कितीही रक्कम जिंकली तरी 33 टक्के कर सरकारकडे जमा करावाच लागतो. म्हणजे एक कोटी रुपये जिंकल्यावर 33 लाखांचा कर भरावा लागतो, तर दहा हजार जिंकल्यावरही 3 हजार 300 रुपये टॅक्स भरुन केवळ 6 हजार 700 रुपयांवर समाधान मानावं लागतं.
बबिता यांनी एक एक टप्पा पार करत एक कोटी रुपये जिंकले. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर बबिता ताडेंना सात कोटींचा प्रश्नही विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी खेळ तिथेच थांबवण्याचा निर्णय घेत एक कोटी रुपयांमध्ये समाधान मानलं.
एक कोटी रुपये जिंकल्यावर काय करणार, असा प्रश्न जेव्हा बिग बींनी विचारला, तेव्हा बबिता ताडेंनी अगदी भाबडेपणाने मोबाईल फोन घेईन, असं उत्तर दिलं. घरात एकच मोबाईल असून तो सर्व जण वापरतात. त्यामुळे आपल्याला वैयक्तिक मोबाईल असावा, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती.
बबिता ताडेंचा प्रेरणादायी प्रवास
बबिता ताडे या एका सरकारी शाळेत लहान मुलांसाठी मध्यान्य भोजन बनवण्याचं काम करतात. त्यामुळे आजूबाजूचे लोक त्यांना ‘खिचडी काकू’ या नावानेच हाक मारतात. त्या दररोज 450 लहान मुलांसाठी जेवण तयार करतात. गेल्या 17 वर्षांपासून बबिता ताडे ही नोकरी करत असून त्यांना या कामासाठी दर महिना फक्त 1500 रुपये मिळतात.
एक कोटी रुपये जिंकल्यावर पतीच्या अडचणी कमी करण्याचा निर्धार त्यांनी केला. आपल्या परिसरात विखुरलेल्या देवतांसाठी एक मंदिर बांधण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला होता. विशेष म्हणजे कोट्यधीश झाल्यावरही दीड हजारांची नोकरी न सोडण्याची त्यांची इच्छा आहे.
एक कोटींचा प्रश्न काय होता?
मुघल शासक बहादुर शाह जफरच्या दरबारातील कोणत्या कवीने ‘दास्तान ए गदर’ नावाने वैयक्तिक विचार मांडले होते?
A) मीर तकी मीर B) मो इब्राहिम जौक C) जहीर देहलवी D) अबुल क्वाशिम फिरदौशी
उत्तर – C) जहीर देहलवी
सात कोटींचा प्रश्न काय होता?
पुढीलपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक राज्यपाल नंतर राष्ट्रपती झाले?
A) राजस्थान B) बिहार C) पंजाब D) आंध्रप्रदेश
उत्तर – B) बिहार
‘कौन बनेगा करोडपती’च्या अकराव्या पर्वात बिहारमध्ये राहणाऱ्या सनोज राज यांनी पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला होता.