यवतमाळ : कोरोना संसर्ग नियंत्रण मोहिम युद्धपातळीवर सुरु असताना यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटी चेकपोस्ट येथे वाहन तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड झाला आहे (Human Trafficking in Yavatmal amid Corona). नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 7 वर तेलंगाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्याची सीमा लागते. येथून 300 जणांना कंटेनरमध्ये अगदी जनावरांप्रमाणे कोंबून तेलंगाणातून महाराष्ट्रात आणले जात होते. पोलिसांच्या सतर्कतेने ही बाब उघडकीस आली आहे. जमावबंदी आणि संचारबंदी लागू असतानाही समोर आलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
तेलंगाणावरून निघालेला कंटेनर (एच.आर.73/ए-6983) पिंपळखुटी चेकपोस्टवर पोलिसांनी तपासणीसाठी थांबवला. संशय आल्याने चेकपोस्टवरच्या पोलिसांनी कंटेनरचं कुलूप उघडायला लावलं. आतले दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. जवळपास 300 जण या कंटेनरमध्ये अक्षरश: कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. पूर्वी जनावर तस्करीसाठी या पद्धतीचा वापर केला जात होता.
नागपूरवरून जनावरे कत्तलीसाठी हैदराबादला अशाप्रकारे नेण्यात येत होती. हाच अनुभव गाठिशी असल्याने तेलंगाणा सीमा सील करण्यात आली. त्यानंतर छुप्या पद्धतीने येथील व्यक्तींना महाराष्ट्रात आणले जाईल हे गृहित धरून पोलिसांनी पडताळणी केली. त्यानंतर जवळपास 300 जण अवैधरित्या जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे उघड झाले. या अमानवीय प्रकाराबाबत पांढरकवडा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. कंटेनेरमधून आलेल्या नागरिकांना चेकपोस्टवरूनच तेलंगाणात परत पाठवण्यात आले.
Human Trafficking in Yavatmal amid Corona