ठाणे : भिवंडी येथील भाडवड गावात काल (8 मार्च) रात्रीच्या सुमारास जेवण बनवताना अचानक स्टोव्हने पेट घेतल्याने एकाच घरातील पती, पत्नी आणि दोन वर्षाची चिमुरडी भाजल्याची घटना घडली. मात्र अद्याप या आगीचे कारण समजू शकलेलं नाही. आग इतकी भीषण होती की, 28 वर्षीय सस्मिता मलिक 98 टक्के भाजली आहे. तर 35 वर्षीय रतिकम मलिक 25 टक्के भाजला आणि दोन वर्षीय मुलगी सुशश्री मलिक 80 टक्के भाजली आहेत.
मलिक कुटुंब भादवड गावातील पारसपाडा येथील शत्रूतरे चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहतात. रतिकम मलिक यांच्या घरातून रात्री 9.30 वा. च्या सुमारास जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. हा आवाज ऐकताच चाळीतील लोक जमा झाले आणि त्यांनी त्या घराचा दरवाजा तोडला. या आगीत पतीपत्नीसह त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीला आगीच्या ज्वाळांनी वेढलेले होते. यावेळी शेजाऱ्यांनी पाणी ओतून आग विझवत भाजलेल्या तिघांना तात्काळ स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
यंत्रमाग कारखान्यात मोलमजुरी करणारा रतिकम शुक्रवारी कारखान्यातील कामाला सुट्टी असल्याने संध्याकाळी 7.30 वा. मटण घेऊन घरी परतला. त्यानंतर घरातील दोन स्टोव्हवर भात आणि मटण बनवत असताना ही आग पत्नी सस्मिता हिच्या कपड्याला लागली आणि पेट घेतला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी शांतीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जे. जैद यांनी पथकासह भेट देत पंचनामा करुन घटना स्थळावरील स्टोव्ह आणि राॅकेलचा कॅन जप्त केला आहे.