नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केला. पण काही वेळातच दोन नसून एकच पायलट आमच्याकडे असल्याचा यू टर्न पाकिस्तानने घेतला. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा दुसरा व्हिडीओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आलाय. यामध्ये ते चहा पित असून मी सुखरुप असल्याचं सांगत आहेत. अभिनंदन यांच्याविषयी संपूर्ण देशाला चिंता वाटत आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, पाकिस्तानकडून अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लावला जाऊ शकत नाही. पण पाकिस्तानवर विश्वास ठेवणं कठीण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
व्हिडीओ पाहा :
पाकिस्तान ने विंग कमांडर #Abhinandan का एक और वीडियो जारी किया. इस बीच पाक सेना के प्रवक्ता आसिफ गफूर ने कहा है कि सिर्फ एक ही भारतीय पायलट उनके कब्जे में है. सुनिए अभिनंदन ने इस वीडियो में क्या कहा .. #BringBackAbhinandan #Mig21 #Surgicalstrike2 pic.twitter.com/D1dq0SrZvs
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) February 27, 2019
युद्धबंदीसाठी काय आहे नियम?
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नियम पाळत असेल तर अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लावता येणार नाही. कारण, युद्धबंदींसाठी खास करार आहे. जिनेव्हा करार असं याचं नाव आहे. या करारानुसार युद्धबंदींना भीती दाखवली जाऊ शकत नाही, किंवा त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही. युद्धबंदींचा वापर करुन जनतेमध्ये उत्सुकता करण्यासाठीही बंदी आहे.
जिनेव्हा करारानुसार, एकतर युद्धबंदीवर खटला चालवला जाऊ शकतो, किंवा संबंधित देशाकडे त्या युद्धबंदीचं हस्तांतरण करावं लागेल. युद्धबंदी पकडल्यानंतर नाव, सैन्यातील पद आणि नंबर सांगण्याची तरतूद आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला अभिनंदन यांना एका सैनिकासारखीच वागणूक द्यावी लागेल.
दरम्यान, जिनेव्हा कराराचं उल्लंघन अनेक देशांनी केलेलं आहे. मानवी मूल्य जोपासण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला होता.