सोलापूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी कधीही सुरक्षा मागितली नव्हती. परंतु आता राज्य सरकारचं त्यावरुन राजकारण सुरु आहे. (I never asked for security, now they are doing while providing security; Devendra Fadnavis)
फडणवीस म्हणाले की, “मी प्रदेशाध्यक्ष असतानासुद्धा सुरक्षा घेतली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतरच मला सुरक्षा मिळाली होती. काही थ्रेट्समुळे (धमक्या) मला ही सुरक्षा देण्यात आली होती. सरकारला आता असे वाटत असेल की, धोका कमी झाला आहे. म्हणून त्यांनी सुरक्षा कमी केली असावी. परंतु त्याची एक पद्धत असते. ठाकरे सरकार राजकीय निर्णय घेत आहे. परंतु माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही.”
या प्रकरणावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीदेखील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरेकर म्हणाले की, आम्हाला आमच्या सुरक्षेची चिंता नाही, तुम्ही राज्यातील जनतेच्या सुरक्षेची काळजी घेतली तरी पुरे आहे. देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्याची गरज आहे, असा अहवाल पोलिसांनी दिला आहे. समितीच्या अहवालावरून निर्णय घेतला जातो, मात्र इथे राजकीय निर्णय घेतले जात आहेत. त्यांचं सरकार आहे, त्यांचे अधिकार आहेत, त्याबद्दल आम्हाला काहीही बोलायचे नाही.
फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेतही कपात
फडणवीसांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. त्यांच्यासोबतच भाजपच्या इतर नेत्यांच्या सुरक्षेतही कपात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड तसेच भाजप नेते आशिष शेलार यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार भाजप नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. त्यांना यापूर्वी झेड (Z) सुरक्षा दिलेली होती. नव्या निर्णयानुसार त्याची ही सुरक्षा व्यवस्था काढली असून त्यांना यानंतर वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येईल.
फडणवीसांच्या जीवाला धोका, तरी सुरक्षेत कपात
मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी यापूर्वी दिला होता. या अहवालात फडणवीसांच्या जीवाला अनेक बाजूने धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फडणवीसांची सुरक्षा कमी न करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांसोबतच गुप्तचर यंत्रणेनं हा अहवाल दिलाय. असे असताना सुद्दा फडणवीसांच्या सुरक्षेत कपात केली आहे.
मुंबई पोलिसांनी फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिल्यांनतर त्यांच्या सुरक्षेत कपात न करण्याची शिफारस करण्यात आली होती. राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनीसुद्धा फडणवीसांच्या सुरक्षा कपातीला विरोध केला होता. मात्र, जैस्वाल यांची बदली होताच सुरक्षा कपातीचा हा निर्णय घेतला गेला.
संबंधित बातम्या :
मुंबई महापालिकेला दोन आयुक्त नकोच; काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडकावली
चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी : सचिन सावंत
(I never asked for security, now they are doing while providing security; Devendra Fadnavis)