नवी दिल्ली : भारतीय वायू सेनेचा बेपत्ता एएन-32 या विमानाचा शोध गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. भारतीय वायू सेना या विमानाचा शोध लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, अद्यापही या विमानाचा कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. एएन-32 हे विमान सोमवारी (3 जून)ला अरुणाचल प्रदेशच्या चीनच्या सीमेजवळून बेपत्ता झाले होते. यामध्ये 13 लोक होते.
पायलट आशिषची पत्नी ट्राफीक कंट्रोलमध्ये ड्युटीवर होती
जेव्हा विमान बेपत्ता झालं, तेव्हा पायलट आशिष तन्वर यांच्या पत्नी संध्या या आसामच्या जोरहाटमध्ये आयएएफ एअर ट्राफीक कंट्रोलमध्ये ड्युटीवर होत्या. त्यांच्यासमोरचं हे विमान बेपत्ता झालं. संध्या यांनीच त्यांच्या घरच्यांना विमानाशी संपर्क तुटल्याची माहिती दिली होती. ‘संध्याने सांगितलं की, दुपारी 1 वाजेपासून विमानाशी संपर्क होऊ शकत नाहीये. तिने आम्हाला याबाबत एक तासानंतर माहिती दिली’, असं आशिषचे काका उदयवीर सिंह यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.
या विमानाचं शोधकार्य गेल्या चार दिवसांपासून निरंतर सुरु आहे. मात्र, वेळेसोबतच आशिषच्या घरच्यांची काळजी आणि भिती दोन्ही वाढत चालली आहे. आशिष यांचे वडील हे देखील आसाममध्ये आलेले आहेत. ते अधिकाऱ्यांना भेटून प्रत्येक अपडेट घेत आहेत. आशिष यांच्या आई घरीच आहेत. पण त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मुलगा अशाप्रकारे बेपत्ता झाल्याने त्यांच्या आईला धक्का बसला आहे. त्या एकटक फक्त आशिषच्या परतण्याची वाट पाहात आहेत.
लेफ्टनंट मोहीतच्या घरी प्रार्थना
पंजाबच्या पटियाला येथील लेफ्टनंट मोहीत गर्ग हे देखील बेपत्ता झालेल्या 13 लोकांपैकी एक आहेत. मोहीत बेपत्ता असल्याची बातमी कळताच त्याच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यांचे कुंटुंबीय मोहीतच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. मोहीत काही दिवसांनी सुट्टीवर घरी येणार होते. मात्र, त्यापूर्वीच ते अशाप्रकारे बेपत्ता झाले आहेत.