नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी प्रादेशिक भाषांमध्ये बँकेची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना गुड न्यूज दिली आहे. आयबीपीएस (Institute of Banking Personnel Selection) च्या वतीने विविध 45 प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आलाय, ज्यामध्ये मराठीचाही समावेश आहे.
बँक परीक्षांमध्ये हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा उपलब्ध होत्या. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहत होते. त्यामुळेच प्रादेशिक भाषांचाही पर्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत होती. अखेर निर्मला सीतारमण यांनी 13 भाषा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा यामध्ये समावेश आहे.
IBPS RRB recruitment साठी नॉटिफिकेशनही जारी झालंय. पण यामध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय होता. त्यामुळे प्रादेशिक भाषांमधील उमेदवारांना या संधीपासून वंचित रहावं लागत होतं. त्यामुळे हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, भाषा निवडण्याचा पर्याय तर देण्यात आलाय, पण IBPS RRB recruitment ला अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे एकतर तारीख वाढवावी किंवा उमेदवारांना भाषा निवडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
IBPS RRB recruitment साठी अर्जाचा शेवटचा दिवस
इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल म्हणजेच आयबीपीएसने ग्रामीण बँकांमध्ये विविध पदांसाठी नॉटिफिकेशन जारी केलंय. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज करता येईल. देशभरातील विविध 45 बँकांची या भरती प्रक्रियेत समावेश आहे, ज्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकही असेल.
या सर्व पदांसाठी वेगवेगळ्या लिंक देण्यात आल्या आहेत. सर्व पदांसाठी 18 जून ते 4 जुलै या काळात अर्ज करता येईल, तर 19 जुलै ही अर्जाची प्रिंट घेण्यासाठी शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे अर्जाचं ऑनलाईन पेमेंटही 4 जुलैपर्यंतच करावं लागेल. या पदांसाठी पूर्व आणि मुख्य कम्प्युटर आधारित परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.
आयबीपीएसच्या ऑफिशिअल कॅलेंडरनुसार, ऑफिस असिस्टंट आणि स्केल वन ऑफिसर या पदांसाठी पूर्व परीक्षेचं आयोजन 3, 4, 11, 17,18 आणि 25 ऑगस्टला केलं जाईल. तर ऑफिसर स्केल वनच्या मुख्य परीक्षेचं आयोजन 22 सप्टेंबर आणि असिस्टंट मुख्य परीक्षेचं आयोजन 29 सप्टेंबर रोजी केलं जाईल. या प्रक्रियेनुसार ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 साठी आयोजित केले जातील. अर्ज करण्यासाठी विनाआरक्षित प्रवर्गासाठी 600 रुपये फी आहे, तर SC/ST/PWBD प्रवर्गासाठी 100 रुपये फी आहे.
कोणाला अर्ज करता येईल?
अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं गरजेचं आहे. असिस्टंट पदासाठी पदवी आणि संबंधित बँकेची भाषा (उदाहरणार्थ महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी अर्ज करत असाल तर मराठीचं ज्ञान अनिवार्य) येणं गरजेचं आहे. शिवाय कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक आहे. 18 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतील.
ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 या पदांसाठीही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं गरजेचं आहे. शिवाय ठराविक विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिलं जाईल.
परीक्षेचा सिलॅबस, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि संबंधित माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा