नवी दिल्ली : टॅक्स आणि डीलर्स कमिशन हटवल्यास राजधानी दिल्लीत पेट्रोल 34.04 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 38.67 रुपये प्रति लिटर मिळेल. पेट्रोलवर टॅक्स आणि डीलर्स असोसिएशनचा मूळ किंमतीच्या 96.09 टक्के आणि डिझेलवर 60.03 टक्के भार पडतो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ल यांनी लोकसभेत सांगितलं. एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
पेट्रोल आणि डिझेलवर कराचा सर्वात मोठा भार आहे. राजधानी दिल्लीचं उदाहरण घ्यायचं झालं, तर 70 रुपये लिटर पेट्रोलवर 17.98 रुपये एक्साईज ड्युटी आणि 15.02 रुपये दिल्ली सरकारचा टॅक्स आहे. तर यामध्येच 3.59 रुपये डीलर्स कमिशन आहे. तर डिझेलच्या 64 रुपये किंमतीवर 13.83 रुपये एक्साईज ड्युटी आणि 9.51 रुपये व्हॅट, तर 2.53 रुपये डीलर्स कमिशन आहे.
विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळा व्हॅट आहे. इंधनाच्या किंमती दररोज निश्चित होतात. पण कर आणि डीलर्स कमिशन यामुळे किंमती किती गगनाला भिडल्यात ते पुन्हा एकदा समोर आलंय. वाचा – पेट्रोल दरवाढीमागचा सर्वात मोठा व्हिलन ‘ओपेक’ कोण?
केंद्र सरकारने गेल्या आर्थिक वर्षात पेट्रोलवर 73 हजार 516.8 कोटी रुपये एक्साईज ड्युटी वसूल केली आहे. तर डिझेलवर 1.5 लाख कोटींची एक्साईज ड्युटी वसूल करण्यात आली आहे. वाचा – संपूर्ण जगाला पेट्रोल पुरवणाऱ्या सौदीतील पाणी 11 वर्षात संपणार!
ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी आसमान गाठलं होतं. मुंबईत पेट्रोलचे दर 90 रुपये प्रति लिटरवर गेले होते, तर डिझेलनेही 80 चा टप्पा पार केला होता. पण गेल्या दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे किंमतीही घसरल्या आहेत.