बारामती : भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई दौंडमध्ये करण्यात आली (Illegal sand lifting) आहे. दौंडमधील शिरापूर हिंगणी या ठिकाणी बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या वाळू उपसावर बारामतीच्या क्राईम ब्राँचने कारवाई केली आहे. यात एकूण 2 कोटी 43 लाख रुपयांच्या 31 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय 6 वाळून भरलेले ट्रक आणि 3 जेसीबी मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. तर 17 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरापूर हिंगणी येथे भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकण्याचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन परिसरातील शिरापूर- हिंगणी येथे जाऊन माहिती घेतली. त्यानंतर बारामती क्राइम ब्रांचचे पोलीस जवान आणि जलद कृती दलाचे 20 जवान यांच्या मदतीने अचानक छापा टाकला. यावेळी भीमा नदी पात्रात अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. यांत्रिक बोटीने वाळू उपसा करून जेसीबी आणि इतर यंत्रांच्या साहाय्याने ट्रक मध्ये भरून चोरी करत असताना काही आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलं.
यात 1,14,00,000/- 19 फायबर लोखंडी बोटी (प्रत्येकी किंमत सहा लाख), 30,00,000 /- 10 लहान बोटी (प्रत्येकी किंमत तीन लाख रुपये), 24,00,000 /- दोन हायड्रोलिक फायबर बोट (प्रत्येकी किंमत बारा लाख), 3,10,000 /- (62 ब्रास वाळू), 42,00,000 /- सहा ट्रक, 30,00,000 /- तीन जेसीबी असा एकूण 2 कोटी 43 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एकूण 17 आरोपींविरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला (Illegal sand lifting) आहे