मुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : गेली 10 वर्षे झाली ऐकत आहोत की अच्छे दिन येणार, अच्छे दिन येणार, पण, खरेच अच्छे दिन आलेत का..? आज इतिहासातील गोष्टीवर भांडायला लावत आहेत. ज्यांच्याकडे द्यायला काही नसतं ती लोकं, ते नेते इतिहासातील मुद्द्यावर भांडत असतात. नेहरूंनी काय केलं? १०० वर्षांपूर्वी काय झालं? ५०० वर्षांपूर्वी काय झालं? पण, आपण मुंबईत आहोत. महाराष्ट्रात आहोत. आपण भविष्यावर काम करणारी लोकं आहोत. त्यांच्या फक्त tagline बदलतात. परिस्थिती तीच राहते. अब की बार ४०० पार वैगरे वैगरे. फक्त निवडणुका आल्या की यांच्या घोषणा बदलतात. काम काही होत नाहीत अशी टीका युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.
दिल्लीतल्या शेतकरी बांधवांवर आश्रुधुर सोडण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं नाही. शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे रोवण्यात आले. शेतकरी राजा किती राबतो याची आपल्याला कल्पना नाही. आपल्या ताटात हे काही येतं ते शेतकऱ्यांमुळेच, दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पूर्ण मिलिटरी फौज तैनात करण्यात आलीय. जणू काही चायना पाकिस्तान सीमा आहे. भारतरत्न सुद्धा अगदी निवडून आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करून देण्यात आले. त्यातील एक भारतरत्न हे एस स्वामिनाथन यांना देण्यात आले. स्वामिनाथन यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. आज त्याच शेतकऱ्यांसोबत काय करत आहेत..? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
आज मणिपूर जळत आहे. त्याकडे जाणवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. संसदेत दोन तरुणांनी उडी मारली. त्यांना माहित होतं की त्यांच्यावर UAPA लावलं जाईल. संसदेत पंतप्रधान असते तर त्यांच्या SPG सुरक्षा रक्षकांनी शूट at site केलं असतं. याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी रिस्क घेतली. त्याचे समर्थन नाही पण त्यांच्याकडे रोजगार नाही, काम नव्हतं, त्यांना असं करायला कोणी लावलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल
आता सुद्धा ते काही तरी रडारड करत आहेत. पण, तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर ही टैगलाइन कधीच पुसली जाणार नाही. महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातमध्ये पाठवले. तुम्ही म्हणाल की मी तेच तेच बोलत आहे. पण, एक लक्षात घ्या की आपल्याकडे येणारा वेदांत फॉक्स्ककौन आता देशात कुठेच बनणार नाहीये. या मंत्रिमंडळात एक असा मंत्री आहे ज्याने एका महिला खासदाराला शिवीगाळ केली होती. त्याला प्रमोशन देण्यात आलं. आमच्या मंत्रिमंडळात एका गद्दारावर गंभीर आरोप झाले. त्याला लगेच हकालवून लावलं. पण, जेव्हा गद्दारांचे सरकार आले आणि त्याला लगेच मंत्रिपद दिले, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
याला आमदार बनवू. त्याला खासदार बनवू. पण, तरुणांचे काय..? त्यांच्या रोजगाराचे काय? परवा तलाठी भरतीचा पेपर १०० मार्कांचा. पण, मार्क किती तर १२०. त्यांना विचारलं की परीक्षा काय EVM मध्ये देत होतात काय..? पेपरफुटी इतकी वाढली आहे की पेपर फोडणाऱ्या विरोधात कायदा तीव्र करायला पाहिजे. पेपर फोडणाऱ्या लोकांना १० वर्षांची शिक्षा देण्यात यावी. आम्ही सत्तेत आलो की हा कायदा नक्की करणार असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांना सल्ला
इकबाल मिर्ची सोबत बसणाऱ्यांना भाजपने सोबत घेतलं आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांविषयी मला वाईट वाटते. आता ज्या काही नेत्यांना पद दिले आहेत त्यातले अनेक बाहेरचे आहेत. मी राहुल गांधी यांना सल्ला देईन की तुम्हाला पंतप्रधान बनायचं असेल तर तुम्ही भाजपमध्ये जा. कारण, तिथे सर्व काँग्रेसवालेच आहेत. भाजपचा नारा आता बदलला आहे दाग अच्छे है, वाशिंग पाउडर भाजपा… जेवढे गद्दार, भ्रष्टाचारी आहेत ते सर्व भाजपमध्ये आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.