नवी दिल्ली : जगभरात कोरोना संसर्गानं थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात इतर कशाहीपेक्षा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित झालं आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जगभरात त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona 10 Interesting things). भारतात जनता कर्फ्यूच्या घोषणेमुळे अशाच काहीशा न घडलेल्या गोष्टी घडल्या आहेत.
1. चीनमध्ये तब्बल 2 कोटींहून जास्त मोबाईल क्रमांक नॉट रिचेबल आहेत. महत्वाचं म्हणजे जानेवारीपासूनच हे 2 कोटी मोबाईल नंबर संपर्काबाहेर गेलेत. जानेवारी ते फेब्रुवारी या दोन्ही महिन्यात चीनमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातला होता. त्यामुळे चीन खरोखर मृतांचा आकडा लवपत आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. काही परदेशी वृत्तवाहिन्या आणि वेबपोर्टल्सने ही बातमी प्रसिद्ध केलीय. सध्या जगाात सर्वाधिक मोबाईल युजर चीनमध्ये आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक भारताचा लागतो.
2. अत्यावश्यक गोष्टींबरोबरच लॉकडाऊनच्या काळात कंडोमच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. काही मेडिकल चालकांच्या माहितीनुसार फक्त 10 किंवा 20 नव्हे तर तब्बल 50 टक्के कंडोमची विक्री वाढलीय. हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार एरव्ही कंडोमच्या विक्रीत मोठ्या सुट्ट्यांमध्ये वाढ होते. मात्र लॉकडाऊनमध्ये सुट्ट्यांच्या काळतील विक्रीपेक्षाही कंडोमची मागणी अधिक आहे. मात्र पती किंवा पत्नी यांच्यापैकी कुणालाही साधा सर्दी किंवा ताप असेल, तरी त्यांनी शारिरिक संबंध ठेऊ नयेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.
3. कोरोनामुळे कोट्यवधी लोक घरातच आहेत. त्यामुळे मनोरंजनासाठी दूरदर्शन रामायण आणि महाभारत या दोन्ही पालिका पुन्हा टेलिकास्ट करण्याच्या विचारात आहे. कोरोनामुळे नवीन कोणतेही सिनेमे प्रदर्शित होणार नाही. शिवाय मालिकांचंही शुटिंग थांबल्यामुळे अनेक वाहिन्या जुने एपिसोड पुन्हा दाखवत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांकडे डीटीएच सेवा नाही. त्यांच्या करमणुकीसाठी दूरदर्शन कधीकाळी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या रामायण आण महाभारत या दोन्ही मालिका पुन्हा प्रसारीत करण्याच्या तयारीत आहे.
4. लॉकडाऊनच्या काळात दारु मिळावी, म्हणून केरळमध्ये एका तरुणानं थेट कोर्टात याचिका दाखल केली. मात्र कोर्टानं याचिका तर फेटाळून लावलीच, त्याउलट त्या तरुणाला 50 हजारांचा दंडही लावला. जनहित याचिका ही लोकांच्या हितासाठी करायची असते. मात्र, वैयक्तिक स्वार्थासाठी या तरुणानं कोर्टाचा वेळ वाया घातल्याचा या तरुणावर ठपका ठेवण्यात आला आणि त्याला दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम त्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5. कोरोनाच्या विषाणुच्या संसर्गानंतर पहिल्यांदाच देशातल्या तब्बल 102 शहरांमधली हवा स्वच्छ झालीय. देशात मोठ्या शहरांपैकी लुधियानात बुधवारी (25 मार्च) सर्वाधिक कमी प्रदूषण नोंदवलं गेलं. मुंबई आणि दिल्लीतल्या हवेचं प्रदूषण कमी झालंय. मात्र लखनौ आणि मुझफ्फरपूर या शहरांमधल्या प्रदूषणाचा टक्का अद्याप कमी झालेला नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही माहिती दिलीय.
6. बजाजसह बड्या उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार कापणार नसल्याचं जाहीर केलंय. कोरोनाच्या काळात नोकरदारांसाठी ही काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. बजाज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार कुणाचाही पगार किंवा कुणालाही नोकरीवरुन कमी केलं जाणार नाही. याशिवाय आदित्या बिर्ला, एस्सार ग्रुप, वेदांत ग्रूप यांनीही हाच निर्णय घेतला आहे. टाटा कंपनीचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनीही होमक्वारंटाईनच्या काळात घरी राहणाऱ्यांना पूर्ण पगार दिला जाणार असल्याचं सांगितलंय.
7. देशातले संपूर्ण टोल 14 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सलग 21 दिवस देशभरातले टोल बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. अत्यावश्यक सेवांना कोणतीही अडचण होऊ नये, म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र रस्त्यांची देखभाल, टोलवरची आपात्कालीन व्यवस्था मात्र सुरुच राहणार आहे.
दरम्यान, फक्त सरकारी वाहनं, रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक वस्तूंची- ने-आण करणाऱ्या गाड्या यांनाच रस्त्यावर चालवण्याची परवानगी आहे.
8. लॉकडाऊनच्या काळात अकोला जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये फक्त 2 गुन्हे नोंदवले गेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात 24 तासात फक्त 2 गुन्हे नोंदवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. आधी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर आल्यामुळे पोलिस आयुक्तांनी जनतेला मदतीचं आवाहन केलंय.
9. पुण्यात बुधवारी (25 मार्च) गुढीपाडव्याच्या मुहू्र्तावर वाहन खरेदी झाली नाही. एकही वाहन किंवा सोनं खरेदीविना हा पुण्यातला पहिलाच गुढीपाडवा असावा. एका माहितीनुसार गेल्यावर्षी पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साडेसात हजार, तर पिंपरी-चिंचवड भागात साडेतीन हजार वाहन विक्रीची आरटीओकडे नोंद झाली होती. मात्र यंदा कोरोनामुळे मोठा फटका बसलाय.
10. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा 1 हजारच्या वर गेला आहे. चीन, इटली, स्पेन आणि त्यानंतर अमेरिकेसाठी कोरोना सर्वाधिक डोकेदुखी बनलाय. सुरुवातीच्या काळात कोरोनाला नियंत्रणात केल्याचे दावे अमेरिका करत होती. मात्र काही तज्ज्ञांच्या मते चीननंतर अमेरिका कोरोनाचं दुसरं ठिकाण बनू शकतं. कारण, इटली आणि स्पेनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त असली, तरी पर्यटन आणि लोकसंख्येचा आकडा याबाबत अमेरिका या दोन्ही देशांपासून खूप पुढे आहे.
संबंधित बातम्या:
कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी
‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी
दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी
संबंधित व्हिडीओ: