पुणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे (Online order home delivery company in Pune). यावेळी त्यांनी ऑनलाईन कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑनलाईन सेवा देताना फक्त जीवनावश्यक वस्तू, अन्न, फळे, भाजीपाला यांचाच अंतर्भाव असावा, असं दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं.
दीपक म्हैसेकर म्हणाले, “ऑनलाईन कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करावा. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना फक्त वस्तू, अन्न, फळे, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूच घरपोच कराव्यात. ज्या संस्थांकडे औषध सेवा पोहच करण्याचा परवाना असेल त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे देण्याची व्यवस्था करावी.”
होम डिलिव्हरी सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉयला जे पास दिले आहेत त्याचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी. ज्या क्षेत्रासाठी पास असेल त्या क्षेत्राबाहेर सेवा देऊ नयेत. डिलिव्हरीसाठी वाहनांची संख्याही मर्यादित ठेवावी. सिल केलेला भाग अथवा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सेवा देऊ नयेत. त्याचप्रमाणे सिल केलेल्या भागात राहणाऱ्या डिलिव्हरी बॉयला डिलिव्हरीसाठी परवानगी दिली जाणार नाही, असंही दीपक म्हैसेकर यांनी नमूद केलं.
“कोरोनाबाधित रुग्णांच्या निधनानंतर नातेवाईकांना मृतदेह मिळणार नाही”
यावेळी दीपक म्हैसेकर यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांना दिला जाणार नसल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, “कोरोनाबाधित रुग्णांचे निधन झाल्यास संबंधित रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत. त्या मृतदेहांवर गॅस किंवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येतील. मृतदेह दफन करायचे असल्यास शहरापासून दूर अंतरावर 6 फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये निर्जंतूक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये दफन केला जाईल.”
वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती दिली. पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड – 19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या ताब्यात घेण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
पिंपरीत मुलगा 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर, लॉकडाऊनमध्ये पोलिस पित्याचा संघर्ष
MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा, यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?
ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल
Online order home delivery company in Pune