नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्वच स्तरातून कोंडी केली. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव टाकण्यात आला. यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी जमिनीचा वापर दहशतवादी संघटनांना करु देणार नाही, असं निर्धार केला. इतकंच नाही तर पूर्वीच्या सरकारमुळे पाकिस्तानात दहशतवादात मोठी वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
देशाबाहेर दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशातील दहशतवादी संघटनांना थारा देणार नाही असं इम्रान यांनी नमूद केलं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढल्यामुळे इम्रान खान यांनी दहशतवादाविरधोत कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा भाऊ आणि मुलगा या दोघांवर बंदी घालण्यात आली आहे, तर इतर 42 जणांना अटक करण्यात आली. याशिवाय पाकिस्तानमध्ये 121 जणांना अटक झाल्याचंही सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर 182 मदरशांवरही बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या अल्पसंख्यांकाबद्दल इम्रान खान यांनी म्हटलं की, देश अल्पसंख्यांकांच्या पाठीशी उभा आहे, भारतामध्ये अल्पसंख्यांकावर अन्याय केला जातो. मात्र पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर कोणताही भेदभाव केला जात नाही, आसा दावा त्यांनी केला.
पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. हा हल्ला पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने केला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. यामुळे गेले काही दिवस भारत-पाकच्या सीमेवर तणावाचे वातावरणआहे.